शौर्य, संशोधन, कला, ज्ञानार्जन, क्रीडा या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारावर राज्यातील मुलांनी मोहोर उमटवली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने देशभरातील ३२ मुलांना हा पुरस्कार जाहीर केला असून त्यातील पाच मुले राज्यातील आहेत.

‘महाराष्ट्राची माती ही गुणांची खाण आहे हेच या मुलांनी सिद्ध केले आहे. लढवय्येपणा, शौर्य यात महाराष्ट्र मागे हटत नाही. क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राने कायमच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर संशोधन, नवनिर्माण यांतही नवी पिढी उमेदीने पुढे जात आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुक केले आहे.

नागपूर  येथील बाल नवसंशोधक श्रीनभ अग्रवाल याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शेतात ‘येलो मोजॅक विषाणू’ने  पिकांचे मोठे नुकसान होते.‘येलो मोजॅक विषाणू’चा नाश करू शकणारा यशस्वी प्रयोग त्याने केला.

माता मृत्यू रोखण्यासाठी संशोधन :अर्चित पाटील नाशिक : प्रसुती पश्चात रक्तस्रावामुळे होणारे माता मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी जळगाव येथील अर्चित पाटील याने उपाय शोधला आहे. अर्चित हा जळगावच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. अर्चितचे वडील डॉ. राहुल हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून आई डॉ. अर्चना या भूलतज्ञ आहेत. आई-वडिलांसोबत दवाखान्यात जाणाऱ्या आर्चितने महिलांच्या आरोग्य समस्यांविषयी माहिती मिळत गेली. काही वर्षांपूर्वी डॉ. होमी भाभा रिसर्च सेंटरसाठी प्रकल्प करत असताना पाळीच्या दिवसात वापरण्यात येणाऱ्या मेन्स्ट्रअल कपचा त्याने अभ्यास केला. या कपचा वापर करून प्रसुती काळात किती रक्तस्त्राव झाला याची नोंद ठेवता येईल, असे संयंत्र त्याने तयार केले.  अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्टीय विज्ञान महोत्सवात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ज्वालामुखीचा अभ्यासक सोनित सिसोलेकर :  पुणे : पुण्यातील नऱ्हे येथील पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकणारा सोनित सिसोलेकर हा ज्वालामुखीचा अभ्यासक आहे. ‘ज्ञानार्जन’ या विभागात त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे.  ‘वडिलांबरोबर टेकडीवर फिरायला गेल्यावर ते दगड दाखवायचे, दगडांच्या निर्मितीविषयी सांगायचे. त्यामुळे ज्वालामुखीबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्या उत्सुकतेतून वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांचे संकलनही केले.

बुडणाऱ्यांचे प्राण वाचवणारा कामेश्वर वाघमारे : नांदेड : नदीत बुडणाऱ्या दोघांचे प्राण वाचवणाऱ्या १३ वर्षीय कामेश्वर वाघमारे याला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. घोडज येथील मन्याड नदीत पोहण्यासाठी तिघे जण २२ फेब्रुवारी २०२० रोजी गेले होते. यातील दोघे पाण्यात बुडत असताना आठवीत शिकत असलेल्या कामेश्वरने नदीत उडी घेऊन दोघांचे प्राण वाचविले.

सर्वोच्च शिखरे सर करणारी काम्या कार्तिकेयन : मुंबई : गिर्यारोहण क्षेत्रातील ‘माऊंटेन्स आर कॉलिंग, आय मस्ट गो’ हे प्रसिद्ध वाक्य रोज अनुभवणारी काम्या कार्तिकेयन हिला क्रीडा विभागात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येक खंडातील सर्वात उंच शिखर सर करण्याचा ‘अ‍ॅडव्हेंचर ग्रॅण्डस्लॅम’ या पराक्रमाच्या दिशेने १३ वर्षीय काम्याची वाटचाल सुरू आहे. या मोहिमेला ती ‘मिशन साहस’ म्हणते. वडील नौदल अधिकारी असल्याने आत्मविश्वास, साहस, उत्साह हे गुण मुळातच काम्यामध्ये आहेत. . २०१५ साली हिमालयातील चंद्रशीला शिखर सर करण्यापासून काम्याच्या गिर्यारोहणाला सुरूवात झाली. माऊंट स्टोक कांग्री वयाच्या नवव्या वर्षी सर करून काम्या हे शिखर सर करणारी जगातील सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली आहे. तसेच २० हजार फुटांपेक्षा अधिक उंचीचे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात तरुण मुलगी आहे.