गेल्या सोमवारी सकाळी कॉ. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर पाच दिवस मृत्यूशी कडवा संघर्ष करीत असलेल्या या झुंझार नेत्याचे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. कॉ. पानसरे यांच्या निधनानंतर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली असून ‘भाकप’चे महाराष्ट्र सचिव कॉ. भालचंद्र कांगो यांनी रविवारी ‘महराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ हा सवाल काही महिन्यांपूर्वी विचारला जात होता. परंतु, दाभोळकर आणि त्यापाठोपाठ आता पानसरेंच्या निधनानंतर ‘कुठे चाललाय माझा महाराष्ट्र’, असे म्हणण्याची वेळ आली आहे, असा सवाल कांगो यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. हल्लेखोरांना पकडणे एवढेच शासनाचे काम नसून त्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. , अशी प्रतिक्रिया कॉ. भालचंद्र कांगो यांनी दिली.
कॉ. पानसरे यांच्या मृत्यूने महाराष्ट्राने कुशल संघटक, अनुभवसिद्ध लेखक, पुरोगामी विचारवंत आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारा आणखी एक कार्यकर्ता गमावला. मारेकऱ्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.