भीमा कोरेगाव, सणसवाडीतील हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले. मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी केली जाणार, असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

भीमा कोरेगाव येथे सोमवारी विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच दुपारी समाजकंटकांनी सणसवाडी, भीमा कोरेगाव येथे वाहनांवर दगडफेक केली होती. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले असून मंगळवारी राज्यात मुंबईतील गोवंडी, मुलुंड, चेंबूर, तसेच पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांमध्ये हिंसाचाराविरोधात आंदोलन झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, भीमा कोरेगावमध्ये सोमवारी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो बांधव आले होते. या भागात समाजकंटकांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत त्यांचे डाव उधळून लावले. अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांनी सर्व बसेस बाहेर काढल्या, असे त्यांनी सांगितले. या परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला असून हा गंभीर प्रकार आहे. या हिंसाचारामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. ज्या मुलाचा मृतदेह सापडला ती हत्या समजून त्या प्रकरणाचीही सीआयडी मार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले- आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. त्यांना मानणाऱ्या जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. नेत्यांमध

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत दिली जाईल, तसेच जाळपोळीत नुकसान झालेल्या वाहनचालकांना आणि दुकानदारांनाही मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पोलीस जातीपातीचा विचार न करता दोषींवर कडक कारवाई करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.