महाराष्ट्रातील परिस्थिती हातबाहेर गेलीय असा आरोप केला जातो पण वास्तव असं नाहीय असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ‘मिशन बिगीन अगेन’ धोरण जाहीर केल्यानंतर त्यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची नेमकी स्थिती त्यांनी आकडेवारीनिशी सांगितली. ‘महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान आपली माणस करतात तेव्हा दु:ख होतं’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्रात करोनाची ६५ हजार प्रकरणे आहेत. खरंतर पहिला रुग्ण बरा होऊन कधीच घरी गेला. पण आजही त्या रुग्णाची गणती करावी लागेत हे चूक आहे” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“आजपर्यंत महाराष्ट्रात २८ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ३४ हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यात २४ हजार रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नाही. मध्यम ते तीव्र लक्षणाचे ९,५०० रुग्ण आहेत. १२०० रुग्णांची स्थिती गंभीर आहे. त्यात २०० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान आपली माणस करतात तेव्हा दु:ख होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.