मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यातील करोना परिस्थिती, सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आदी मुद्दे चर्चेत असताना मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलं आहे.

करोनाचा शिरकाव झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. या काळात राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्याबरोबरच राज्यातील जनतेला वारंवार आवाहनही मुख्यमंत्र्याकडून करण्यात आलं. दरम्यान, सध्या राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणा येत असल्याचं चित्र आहे. मात्र, पुढील काही दिवसात नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेशन असल्यानं गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचे संकेत महापालिका प्रशासनानं दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

करोना प्रसाराचा वेग मंदावला असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे आगामी काळात नाताळ व नव्या वर्षाचं स्वागत करताना काळजी घेण्याबद्दल मुख्यमंत्री भाष्य करू शकतात. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. दिवाळीत करोनाचा धोका निर्माण झाल्यानं लोकल सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जानेवारीपासून लोकल सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्याविषयी मुख्यमंत्री आज भाष्य करू शकतात. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मेट्रो-३ कांजूरमार्ग कारशेडचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. त्यावरूनही मुख्यमंत्री राज्य सरकारची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.