राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये करोनाचं थैमान सुरूच असून, मागील काही दिवसांपासून दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून मागील दोन दिवसात प्रथमच रुग्ण संख्येनं उच्चांक गाठला. दुसरीकडे बिगीन अगेन महाराष्ट्राचा दुसरा टप्पा लवकरच घोषित केला जाणार, त्यामुळे वाढत चाललेली रुग्णसंख्या आणि लॉकडाउन शिथिलीकरण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं होतं. अखेर ही उत्सुकता संपली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आषाढी यात्रेसंदर्भातही वारकऱ्यांना आवाहन केलं.

राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानांनी ३० जूनपर्यंत हा लॉकडाउन जाहीर केलेला आहे. लॉकडाउन हा शब्द बाजूला ठेवा. लॉकडाउन उठणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत आहोत. एक एक गोष्ट सुरू करत आहोत. मिशन बिगीन अगेन करताना काळजीपूर्वक करत आहोत. धोका टळला आहे, अशा भ्रमात राहू नका. करोनापासून वाचण्यासाठी घरात रहा. अनावश्यक नाही, तर आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा. तुम्हाला धोक्यापासून सावध करणं हे माझं कामच आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार आहे. यापूर्वी मी वारी पाहिली आहे. हेलिकॉप्टरमधून पाहिला. त्याचं मी पहावा विठ्ठल पुस्तकही तयार केलं आहे. यापूर्वी मी विठ्ठल मंदिरात जाऊन नाही, बघितला पण हेलिकॉप्टरमधून बघितला. हेलिकॉप्टरमधून मी विठ्ठलाचं विश्वरूप पाहिलं आहे. हजारो वारकरी रिंगण करून विठ्ठलाचं नामस्मरण करतात. यंदा मी मुख्यमंत्री म्हणूनच नाही, तर वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. या संकटातून बाहेर काढण्याचं साकड विठ्ठलाला घालणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“काही ठिकाणी लोकल सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू झाले आहेत. लॉकडाउन असला, तरी शेतकरी अफाट मेहनत करत राबत आहे. मराठवाडा, विदर्भातून बोगस बियाणांसंदर्भात तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. स्थानिक निवडणुका व करोनामुळे कर्जमुक्तीची प्रक्रिया थांबली. त्याचबरोबर ज्यांनी बोगस बियाण विकून शेतकऱ्यांना फसवलं त्यांना शिक्षा होणार. शेतकऱ्यांना त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून दिली जाणार,” अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.