मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत संभाजीराजेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणात संभाजीराजेंनी ११ ऑक्टोबरला एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर सरकारला वाईट परिणाम भोगावे लागेल असा थेट इशारा दिला आहे. संभीजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवरुन बोलणं झाल्याची माहिती यावेळी दिली.

“मी येथे येण्याच्या आधी मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मी फोन केला नव्हता. मुख्यमंत्र्यांनी कुणाशी आणि कसं बोलायचं? यासंबंधी विचारणा केली. मी म्हटलं मराठा समाजाच्या मागण्या स्पष्ट आहेत. तुम्ही बोलावलं तर चर्चेला येण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण ११ ऑक्टोबरला एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा दिल्याचं संभीजीराजेंनी सांगितलं. ही माझी नाही तर मराठा समाजाची भावना आहे असंही यावेळी ते म्हणाले.

“शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाज हा सर्व समाजाला सोबत घेऊन राहिला आहे. मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केलं आहे. मग आता मराठा समाजाला आरक्षणमधून बाहेर का फेकले जात आहे?,” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारला आहे. “आर्थिक दुर्बल घटकामध्ये मराठा समाजाला टाकलेले खपवून घेणार नाही,” असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.