करोना आणि लॉकडाउन शैक्षणिक क्षेत्राचं वेळापत्रक कोलमडलं असून राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षांच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. उर्वरित सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. मात्र, राज्यात करोना प्रसाराची भीती अजूनही कायम असून, परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी उद्या (३० मे) राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक बोलावली आहे.

राज्यातील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा करोना आणि लॉकडाउनमुळे खोळंबल्या होत्या. विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार राज्य सरकारनं सर्व अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांची अंतिम परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (३० मे) कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. या दुपारी बारा वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होणार आहे. यात परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात याव्या, अशी मागणी सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडं केली होती. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परीक्षा घेणं विद्यार्थ्यांच्या आरोग्यांच्या दृष्टीनं शक्य नाही, अशी भूमिका त्यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात मांडली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.