राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून एकीकडे विरोधक यावरुन राज्य सरकावर टीका करत असताना सत्ताधारी नेतेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. एकीकडे अधिवेशनावर चर्चा सुरु असताना राज्यात सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांना भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरही चर्चा सुरु असून विरोधक सरकारला घेरत आहेत. उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात यासंबंधी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. दरम्यान करोनाच्या प्रश्नावर जाता जाता त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

करोनासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “करोना गंभीर विषय आहे. सध्या राज्यासाठी अर्थसंकल्प मांडला असून करोनाच्या विषयावर एक दोन दिवसांत आपल्याशी बोलेन. किंबहुना अधिवेशन संपल्यानंतर आपल्या विरोधी पक्षनेत्यांना आवडतं ते फेसबुक लाईव्ह करेन”.

फडणवीस काय म्हणाले होते –
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपालांच्या भाषणावरील अभिनंदन प्रस्ताव मांडताना फडणवीसांनी राज्य सरकारने राज्यपालांना चौकातलं भाषण दिल्याची टीका केली होती. सरकार फक्त फेसबुक लाईव्ह करत असल्याची टीका करताना फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं २१ फेब्रुवारीचं लाईव्ह सर्वोत्कृष्ट होतं असंही म्हटलं होतं.

“२१ फेब्रुवारीचं फेसबुक लाईव्ह सर्वोत्कृष्ट होतं, कारण…”; उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा उपहासात्मक टोला

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न आहे. पण, २१ फेब्रुवारी २०२१ चं फेसबुक लाईव्ह उत्तम होतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का विचारलं…मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले,” असा उपहासात्मक टोला फडणवीसांनी लगावला.

मनसुख हिरेन प्रकरणावर उद्धव ठाकरे काय म्हणाले –
“यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच असते. स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे, प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तोदेखील आमच्याकडे आहे आणि म्हणून एटीएसकडे हा तपास दिला आहे. पण एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मोहन डेलकर प्रकरणाचा तपास करणार-
“त्याचप्रमाणे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने सिलवासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे. हा विषय पण गंभीर आहे पण कदाचित याविषयी बोलण्यासाठी विरोधी पक्षाला तोंड नाही. केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अख्त्यारित येतो हे तुम्हाला माहित आहे. सात वेळा निवडून आलेल्या खासदाराने मुंबईत येऊन आत्महत्या करावी हे तिथल्या प्रशासनाला लांछनास्पद आहे. सुसाईट नोट सापडली असून काही उल्लेख आहेत. उल्लेख आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि कितीही मोठा असला तरी शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपाला वाजपेयींच्या वक्तव्याची आठवण करुन देत सांगितलं की, “सरकार येतं आणि जातं पण मूळ यंत्रणा बदनाम करता कामा नये. सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. महाराष्ट्रात काही व्यवस्थाच नाही आणि सगळं काही केंद्राच्या अख्त्यारित आहे असं दाखवत आहेत. तसं असेल तर इंधन दरवाढीचा मुद्दाही त्यांच्या पदरात टाका”.

“महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री होते त्यांचा सरकारवर विश्वास नाही. पण दुर्दैवाने मोहन डेलकर यांनी येथील सरकार योग्य ती चौकशी करेल आणि आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांना शासन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही निवेदन दिलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.