राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून ठाकरे सरकारची चिंता वाढू लागली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली. २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्याला पुन्हा एकदा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का याबाबत माहिती अद्याप तरी दिलेली नाही”.

आणखी वाचा- करोना वाढताच निर्बंध वाढले; ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

रुग्णवाढीचा कळस
गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असून एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद गुरुवारी झाली. गुरुवारी चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. सध्या राज्यात आठ लाख १३ हजार २११ व्यक्ती गृह अलगीकरणात असून ७०९७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ टक्क्यांवर गेले आहे.

आणखी वाचा- करोना संकट गडद : पहिल्या लाटेचा विक्रम मोडला; महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता
राज्यातील १३४ खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी दिली. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून, तीन-चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासानाला दिले. राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांशी संवाद साधत लसीकरणाचा आढावा घेतला.

४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा
करोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंर्त्यांनी केंद्राकडे केली.