सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विषयांबरोबरच राजकीय भूमिकेबद्दलही भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीसंदर्भात भूमिका मांडतांना राजकीय विरोधकांनाही चिमटे काढले.

राज्यावर ओढवलेलं करोनाचं संकट आणि दुसरीकडे विरोधकांकडून होत असलेले राजकीय आरोप यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात आरोपप्रत्यारोपाचे शाब्दिक युद्ध बघायला मिळत आहे. राज्यातील एकूण प्रशासकीय आणि राजकीय पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

“उद्धवजी, आपण पक्षाचं काम जेव्हा सुरू केलं. शिवसैनिक म्हणून, नेते म्हणून, नंतर कार्याध्यक्ष म्हणून आणि शिवसेनाप्रमुखांच्या नंतर. फार मोठा पल्ला आपण गाठला. राज्याला मुख्यमंत्री आपण मिळवून दिलात. पक्ष सत्तेवर आणला. मला आठवतंय आपण जेव्हा कार्य सुरू केलं, तेव्हा शिवसेनेचे युवा नेते होते. आपला उल्लेख शिवसेनेचे युवा नेते म्हणून करायचे. आता आपण साठीमध्ये पदार्पण करीत आहात,” असा प्रश्न विचारत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना थांबवलं आणि म्हणाले,”योगयोग आहे की, साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री जरी असलो, तरी असं नाही की याज’साठी’ केला होता अट्टाहास, असं नाहीये. हा योगायोग आहे.” असं ठाकरे म्हणाले.

आपला प्रश्न विचारताना राऊत म्हणाले,”साठी पदार्पण हा योगायोग नसेल, पण महाराष्ट्रासाठी,” असं म्हणत राऊत थांबले. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,”मला वाटतं कदाचित जगातलं एकमेव माझं उदाहरण असेल, सगळ्यात ज्याची कुवत कमी लेखली गेली, तो पक्षाचा सर्वोच्च नेता झाला. आणि याची कुवत किंवा याला काही कळत नाही, असं म्हणणारा मुख्यमंत्रीही झाला,” असं उत्तर ठाकरे यांनी दिलं.