नागपुरात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधिमंडळ सचिवालय कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यां नी उद्घाटन करत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असल्याचं सांगताना माणसं मात्र दूर जात असल्याची खंत व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विदर्भाचा उल्लेख करत एक वचनही दिलं.

उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनानंतर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा काही वेळासाठी आवाजाची समस्या जाणवत होती. ‘अरे नागपूरवाले मला म्यूट का करताय?,’ अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, “गेल्या हिवाळी अधिवेशनात आपण सर्वजण तिथे होतो. तेथील विधीमंडळाची वास्तू मी पाहत होतो. सुंदर अशा या वास्तूला एक इतिहास आहे. अशा वास्तुमध्ये अधिवेश होत असताना तेवढ्या काळापुरतं कार्यालय चालू ठेवणं योग्य नव्हतं. पण आता बाराही महिने कार्यालय चालू राहील”.

आणखी वाचा- सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं; चंद्रकांत पाटलांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

“करोनाच्या संकटामुळे अधिवेशन घेऊ शकलो नाही ही एक क्लेषकारक गोष्ट आहे. त्यानिमित्ताने विदर्भात येणं होतं, राहणं होतं. विदर्भातील आपली लोकं भेटतात. त्यांच्या काही व्यथा, प्रश्न, वेदना असतात त्यांची जाणीव होते आणि मार्ग निघतो,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “अधिवेशनाचं एक वैशिष्टय म्हणजे अधिवेशन नागपुरात होतं, पण असं असलं तरी फक्त विदर्भाच्या प्रश्नावरच बोलत असतो असं नाही,” असंही ते म्हणाले.

“गेल्या वेळी जेव्हा अधिवेशन झालं होतं तेव्हा महाविकास आघाडी सरकाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. हे धाडसी पाऊलं होतं. अनेकांना आश्चर्य वाटलं असेल,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा”; उद्धव ठाकरेंना आमदाराने सूचवलं नाव

“करोनाने एक नवी पद्धत आपल्याला दिली आहे. तंत्रज्ञानामुळे कोणीही कुठूनही बोलू शकतो. लंडन, अमेरिकेतलाही माणूसही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकला असता. या प्रणालीमुळे जग जवळ आलं आहे पण माणसं दूर जात नाहीत ना हा एक मोठा प्रश्न आहे. ही माणसं आपण दूर जाऊ देणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी विदर्भवासियांना वचन दिलं. ते म्हणाले की, “विदर्भवासियांना एक वचन देतो की तुम्ही नेहमी आमच्या ह्दयाजवळ आहात. तुमच्यावर कधीही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कोण करत असेल तर ढाल म्हणून उभे राहू. तुमच्या हक्काची व्यक्ती, सरकार म्हणून उभे राहू”.