पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीआधी कडवी झुंज होईल अशी अपेक्षा असताना तृणमूल काँग्रेसने मात्र सहजपणे बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा मात्र शंभरी ओलांडण्यातही यशस्वी झालेली नाही. दरम्यान पश्चिम बंगालमधील विजयानंतर देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.

“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्याच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय या वाघिणीलाच द्यावे लागेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारं ममतादीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममतादीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचे मनापासून अभिनंदन करतो,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता राजकारण संपले असेल तर सर्वांनी मिळून करोनाविरोधातील लढाईकडे लक्ष देऊया असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.