मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून राज्याशी संबंधित अनेक मुद्दे मांडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही बैठक जवळपास दीड तास सुरु होती. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक भेट झाल्याचीही चर्चा होती. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांना मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो असं उत्तर दिलं.

मोदी-ठाकरे भेट : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नातं तुटलं असा नाही. लोकसत्ताच्या मुलाखतीतही हे सांगितलं होतं. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना आत्ताही मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

“मधल्या काळात त्यांचा फोन आला आणि सरकार चांगलं काम करत आहे सांगितलं हे व्यक्तिगत बोलणच होतं. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असं सांगितलं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली ? असं विचारलं असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावं असं ते म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

राज्यपालांची मोदींकडे तक्रार

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी मोदींसमोर विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दाही मांडला. “सरकार बहुमतात आहे. कॅबिनेटने ठरावा केला आणि राज्यपालांना भेटलो. या १२ जागा जवळपास आठ महिन्यापासून रिक्त आहेत. नियमावलीत ज्याप्रमाणे व्यक्ती निवडताना अटी असतात त्या सर्वांचा त्यात समावेस आहे. तर तो मुद्दाही आम्हीही मोदींकडे मांडला. यावर त्यांनी जे काही करण्याची गरज आहे त्यासंबंधी निर्णय घेतो असं सांगितलं आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. चर्चा समाधानकारक झाली असून पंतप्रधानांनी आम्हाला ९० मिनिटं वेळ दिला असंही त्यांनी सांगितलं.