पाणी म्हणजे आयुष्य आहे. विकासाच्या अनेक गोष्टी आपण करत असून आत्मनिर्भर आहोत. लवकरच मुंबईत मेट्रोच्या कोचचं उत्पादन राज्यात सुरु करु. पण जग कितीही पुढे गेलो तरी अजून पाण्याची निर्मिती करु शकत नाही. आपण वाट्टेल ते बनवतो पण पिण्याचं पाणी निर्माण करु शकत नाही हे सत्य आहे आणि ते मानायला पाहिजेच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. न्हावा शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

“कालच मी प्रेमाने आणि अधिकाराने राज्यातील जनतेला काही सूचना केल्या आहेत. त्यावेळी हा कार्यक्रम माझ्या डोक्यात होता. एकीकडे मी लोकांना गर्दी करु नका असं सांगत असताना आजच माझा हा कार्यक्रम होता. खूप गर्दी झाली तर काय अशी मनात धाकधूक होती. पण गुलाबरावांनी या कार्यक्रमाला आलंच पाहिजे असा आग्रह केला कारण हा कार्यक्रम जनता आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कार्यक्रम मर्यादित करावा लागेल असं मी सांगितलं होतं. नाही तर खाली बसलेल्या सर्वांना व्यासपीठावर घेऊन आणि मैदानात कार्यक्रम घ्यावा लागला असता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“जनतेच्या हिताचं काम करत असताना जनतेला धोका पोहोचेल अशाने सुरुवात केली तर कामांना आणि सूचनांना काय महत्व राहिलं,” असंही ते म्हणाले. “सॅनिटायझर गिफ्टि दिलं, पण त्याचे फवारे मारुन स्वागत नाही केलं हे नशीब,” अशी कोपरखळी यावेळी त्यांनी मारली.

“आपण वाट्टेल ते बनवतो पण पिण्याचं पाणी निर्माण करु शकत नाही हे सत्य आहे आणि ते मानायला पाहिजेच. गेल्या आठवड्यात मी जव्हारला जाऊन आलो. पालघर जिल्हा निर्माण झाल्यानंतर त्याच्याकडे आधीच्या सरकारने लक्ष दिलं नाही आणि आपलं एक वर्ष तर करोनामध्ये गेलं. तिथे गेल्यानंतर पाण्याचं भीषण वास्तव पहायला मिळालं. पाण्यासाठी होणारी गर्दी भयावह असते. जसं अर्थनियोजन करावं लागतं तसं पाण्याचं नियोजनही गरजेचं असतं,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.

“तहान लागल्यावर विहीर किती खोदायची याला काही मर्यादा नाहीत. गमतीने एकदा मी म्हटलं होतं की एवढं खणत जाऊ की व्हाइट हाऊसमधून बाहेर पडलो की काय…तरी पाणी लागत नाही. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांसोबत एक कॉन्फरन्स होती. नीती आयोगाच्या या बैठकीत धोरणं मांडली जात असताना ज्या विकासाच्या मागे लागलो आहोत, निसर्गाचा समतोल बिघडू नये हा मुद्दा मी अधोरेखित केला,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

“आपल्याकडे चांगली वनसंपदा आहे. खासकरुन मुंबईपासून रायगड आणि सिंधुदूर्गपर्यंत हा आपला कोकण किनारपट्टा निसर्गाने नटला आहे. आपल्याला समुद्रकिनारा लाभला आहे. विकास करताना ही निसर्गसंपदा नष्ट करायची आणि प्रदूषण करणारे राक्षस तिथे आणायचे हा विकास परवडणारा नाही. कागदावर गोंडस वाटत असता तरी तो जीवघेणा आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“करोनाच्या सुरुवातीच्या काळात बेड्स, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिता वैगेरे मिळत नव्हते ते भीतीदायक आहेच. पण सगळं बंद झाल्यानंतर प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचं लक्षात आलं होतं. अगदी काही ठिकाणी येथून हिमालय दिसत असल्याचं बोलत होते. मी आपलं रोज गच्चीत जाऊन दिल्ली दिसतीये का पाहत होतो. कारण आपलं लक्ष दिल्लीकडे असायलाच पाहिजे,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरेंना तुम्ही दिल्लीत जाता तेव्हा काय करता हे कळलं पाहिजे यासाठी लक्ष असतं अशी कोपरखळी मारली.

“स्वातंत्र्याला आता ७५ वर्ष पूर्ण होत असून आजही जर आपण खेड्यापाड्यात पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकलो नसलो तर आपल्या कौतुकाला अर्थ नाही. हे सगळं पाहत असताना मंगळावर पाणी आहे का? याचा शोध सुरु असल्याचे फोटो येतात. हे किती विचित्र आहे. मंगळावरच्या पाण्याचा शोध घेतात पण माझ्या रायगडमध्ये, जव्हारमध्ये पाणी नाही. मंगळावरती पाणी आहे..काय शोध लावला. मंगळापासून रायगडापर्यंत पाईपलाइन टाकता का? अशा काही विकासाच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या जमिनीवरचा विकास केला पाहिजे. मुंबईला जोडून असणाऱ्या या जिल्ह्यात उद्या लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही तर तो विकास टिकणार नाही. वेळेच्या आधी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही मदत हवी असेल तर हे सरकार करण्यास तयार आहे,” असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सजलाम सुफलाम करायचा आहे असंही सांगण्यात मुख्यमंत्री विसरले नाहीत.