24 February 2021

News Flash

सोनम वाँगचूक यांचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन; सलाम करत म्हणाले….

सोनम वाँगचूक यांच्या कार्याने उद्धव ठाकरे भारावले

बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. “ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनमजी सलाम!,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

भारतीय जवानांच्या रक्षणासाठी ‘3 Idiots’ च्या ‘फुंशुक बांगड़ू’ चा नवा अविष्कार!

“देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादित प्रदेश, कडाक्याची थंडी या निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देतानाच, देशाच्या सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जिगरबाज जवान डोळ्यात तेल घालून सतर्क असतात. या जवानांचा आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे नेमका शोध –
बॉलिवूडचा सिनेमा ‘थ्री इडियट्स’मध्ये अभिनेता आमिर खानने पात्र साकारल्यानंतर प्रसिद्धीस आलेले सोनम वांगचुक यांनी देशसंरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या भारतीय जवानांसाठी एक अनोखा अविष्कार साकारला आहे. त्यांनी भारतीय सैन्यांसाठी सौर तंबू तयार केले आहेत.

सोनम वांगचुक यांनी सौरऊर्जेवर आधारित सैन्य तंबू तयार केले आहेत जे एकावेळी भारतीय लष्कराच्या 10 जवानांना वापरता येतील आणि ते पूर्णपणे पोर्टेबल आहेत. तंबूत हिटरचा वापर करण्यात आला आहे, हा हिटर सौरऊर्जेने संचालित होतो. तंबूचे वजन ३० किलोपेक्षाही कमी आहे. तापमानाचा पारा उणे अंशांमध्ये पोहोचला तरीही जवानांना या तंबूत थंडीची जाणिव होणार नाही, अशी या तंबूची रचना आहे.

सोनम वांगचुक यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून या सौर तंबूचे फोटो शेअर केले आहेत. त्यात गलवान व्हॅलीमधील बाहेरचे आणि तंबूच्या आतील तापमान दर्शवताना ते दिसत आहेत. या तंबूंना ‘सोलर हिटेड मिलेटरी टेन्ट’ नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर या तंबूचा एक फोटो शेअर करुन वांगचुक यांनी सांगितले की, उणे १४ डिग्री सेल्सियमध्येही या तंबूत आरामात राहता येते. प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचं कौतुक केलं असून त्यांचं काम हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं म्हटलं आहे. या तंबूचे वजन केवळ 30 किलो असून त्यात तापमान नियंत्रित करण्याची सोय आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचा हा सौरतंबू लडाखमध्ये भारतीय जवानांसाठी वापरल्यास उर्जेसाठी केरोसीनचा वापर टाळता येईल, त्यामुळे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करता येईल असंही सोनम वांगचुक यांनी म्हटलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 3:04 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray sonam wangchuk earth friendly solar military tent indian army sgy 87
Next Stories
1 “जितेंद्र आव्हाडांना हे कोण समजावणार?”; मुंब्र्यातील ‘त्या’ कार्यक्रमावरून टीका
2 कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवारांचं कळकळीचं आवाहन
3 मंगळापासून रायगडापर्यंत पाईपलाइन टाकता का?; भरसभेत उद्धव ठाकरेंचा सवाल
Just Now!
X