टाळेबंदी १५ जूनपर्यंत :  दुकाने २ वाजेपर्यंत खुली; निर्णय स्थानिक पातळीवर

मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या हवी तशी कमी न झाल्याने टाळेबंदीचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. मात्र, रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकतील.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय आता मोठय़ा शहरांमध्ये महानगरपालिका आयुक्त वा जिल्ह्य़ांमध्ये जिल्हाधिकारी घेऊ शकतील. दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचे अधिकार सरकारने स्थानिक पातळीवर दिले आहेत.

रुग्णसंख्येनुसार दोन विभाग करण्यात आले आहेत. ‘अ’ श्रेणीत करोना चाचणीत १० टक्के  किं वा त्यापेक्षा कमी करोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्यांपेक्षा कमी भरलेल्या असल्यास निर्बंध शिथिल के ले जातील. अशी शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील. अन्य दुकाने उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जाईल. मात्र एकल दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल. मॉल्स किं वा व्यापारी संकु ले उघडण्यास परवानगी नसेल. अत्यावश्यक सेवेप्रमाणेच अन्य दुकानेही  दुपारी २ पर्यंतच उघडी ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील वगळता अन्य दुकाने शनिवारी आणि रविवारी दोन दिवस बंद राहतील.

चाचणीत करोनाबाधितांचे प्रमाण २० टक्के  किं वा त्यापेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये कडक निर्बंध लागू असतील. अशा जिल्ह्य़ांच्या सीमा बंद के ल्या जातील. जेणेकरून या जिल्ह्य़ातून लोक बाहेर जाणार नाहीत वा अन्य जिल्ह्य़ातील नागरिका जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये येणार नाहीत. शेतीचा हंगाम असल्याने दुपारी २ पर्यंत खते, बि-बियाणे, अवजारे आदींची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला वेळेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

धान्य, डाळी, फळे, भाजीपाला आदींच्या पुरवठय़ासाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. दुकानांमध्ये कोणत्याही वेळी वस्तुंचा पुरवठा करू शकतात. फक्त मालाची साठवणूक करण्यासाठी दुपारी २ नंतर दुकाने उघडे ठेवू शकतील. पण त्या काळात ग्राहकांना विक्री करता येणार नाही. तसे आढळल्यास कडक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. हॉटेलांना आताप्रमाणेच घरपोच सेवेस परवानगी आहे. हॉटेलांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. हे नियम १५ जूनच्या सकाळी सातपर्यंत लागू राहतील.

कोणत्या दुकानांना परवानगी मिळणार?

केशकर्तनालये, संगणक, पावसाळी वस्तू , कपडे आदी दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का, याची नागरिकांना अधिक उत्सुकता आहे. कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरे किंवा जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते. कोणती आणि कशा पद्धतीने दुकाने उघडण्यास परावनगी द्यायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल.

परीक्षांबाबत राष्ट्रीय धोरण हवे

दहावीच्या परीक्षेबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. आता बारावीच्या परीक्षेचे काय करायचे याचा आढावा घेत आहोत. लवकरच निर्णय घेऊ. पण, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत के ंद्र सरकारलाही काही निर्णय घ्यावा लागेल. करोनाकाळात परीक्षा हा पुढील पिढीच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने आणि विविध राज्यांत वेगवेगळी परिस्थिती असल्याने परीक्षांबाबत राष्ट्रीय धोरण ठरवण्याची गरज असून, केंद्र सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारला पत्र पाठवण्याची, प्रत्यक्ष बोलण्याची तयारी आहे, असेही ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

 

मुंबई, ठाण्यासह दहा शहरांना अधिक सवलती?

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वंतत्र प्रशासकीय घटक म्हणून गणना के ली जाईल. या शहरांव्यतिरिक्त जिल्ह्य़ाच्या अन्य भागासाठी स्वतंत्र घटक असेल. मोठय़ा शहरांमध्ये अधिक निर्बंध शिथिल करता यावेत या दृष्टीनेच हे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यात मोठी रुग्णघट; १८,६०० नवे रुग्ण

मुंबई : राज्याचा रुग्णआलेख घसरत असून, रविवारी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविण्यात आली. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे १८,६०० रुग्ण आढळले असून, ४०२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या २ लाख ७१ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात आतापर्यंत ९४,८४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

रेल्वेसेवेवरील निर्बंध कायम : मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेचा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वापर करता येईल. सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. संपूर्ण जून महिना रेल्वेसेवेचा सामान्यांना वापर करता येणार नाही, असे संके त आहेत.

कॉमर्स : सर्व वस्तूंच्या वितरणास परवानगी : कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेबरोबरच अन्य वस्तूंच्या वितरणाला परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालये बंदच :

सरकारी कार्यालयांमध्ये २५ टक्के  उपस्थितीस परवानगी असेल. खासगी कार्यालये किं वा आस्थापने बंदच राहतील. याबाबत आधीच्या आदेशात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

लसीकरण मोहिमेस गती मिळण्याची आशा

नवी दिल्ली : जून महिन्यात देशात करोना प्रतिबंधक लशींच्या सुमारे १२ कोटी मात्रा उपलब्ध होतील, अशी दिलासादायक माहिती आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. मे महिन्यात ७.९४ कोटी मात्रा उपलब्ध होत्या. वाढीव लसमात्रांमुळे जूनमध्ये लसीकरण मोहिमेस वेग येण्याची आशा आहे.