– खास प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(दि.५) चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. यावेळी वादळग्रस्त भागांतील लोकांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकले होते. याचा तडाखा जिल्ह्यातील १२ तालुक्यांना बसला. दोघांचा मृत्यू झाला तर मालमत्तांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. जवळपास ५ हजार हेक्टरहून अधिकक्षेत्रावरील फळबागा उध्वस्त झाल्या, तर ५ लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले. अनेक जणांचे संसार उघड्यावर आले. वीजपुरवठा खंडीत झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भाग अंधारात आहे. तर दूरसंचार यंत्रणा कोलमडल्या आहेत. लाखो झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठकही घेणार आहेत. या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे या देखील उपस्थित असणार आहे. यावेळी वादळग्रस्त भागांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. वादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. शहरी भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याची कामे सुरु करण्यात आली असली तरी ग्रामिण भागात फार मोठ्या प्रमाणात कामे करावी लागणार आहे. यासाठी महावितरणला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातून तांत्रिक कर्मचारी रायगड जिल्ह्यात पाठविले जाणार आहेत. त्याच बरोबर रोहित्र, वीजेचे खांब आणि तारा यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यासाठी तातडीने निधीची आवश्यकता आहे. त्याबाबतही राज्यसरकारकडून आज मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जिल्ह्यातील वादळग्रस्त भागांची पहाणी केली. यावेळी वादळग्रस्तांसाठी तातडीने विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणा आंतर्गत दिली जाणारी मदत अपुरी असल्याने, कोल्हापूर सांगलीच्या महापूर ग्रस्तांप्रमाणे जिल्ह्यातील वादळग्रस्तांना वाढीव मदत दिली जावी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.