करोनाची लाट पुन्हा येत आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते .

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेनमेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत , केरळ मध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत”.

“पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही करोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व करोना लाटेला आमंत्रण मिळू शकते,” याकडेही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधले.

लस कधीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही; पंतप्रधानांची महत्त्वाची माहिती
करोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

“करोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.