राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस नऊ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या आज जारी केल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या नियुक्त्या केल्या असून, मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या औरंगाबादला तब्बल वर्षभरानंतर पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात लातूर जिल्हाध्यक्षपदी श्रीशैल मल्लिकार्जून उटगे, लातूर शहराध्यक्षपदी किरण जाधव, औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी कल्याण काळे, औरंगाबाद शहराध्यक्षपदी मोहम्मद हिशम ओस्मानी, ठाणे शहराध्यक्षपदी अॅड विक्रांत चव्हाण, भंडारा जिल्हाध्यक्षपदी मोहन विठ्ठलराव पंचभाई, गोंदिया जिल्हाध्यक्षपदी नामदेव दशराम किरसन, चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी रितेश सत्यनारायण तिवारी, चंद्रपूर शहराध्यक्षपदी प्रकाश मारोतराव देवतळे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नियुक्त्या जाहीर केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी नूतन जिल्हाध्यक्षांचं अभिनंदन केलं आहे. “नूतन जिल्हाध्यक्षांचं अभिनंदन. आपण अत्यंत खात्रीनं चांगले काम कराल, सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटनेचा विस्तार कराल याची मला खात्री आहे. संघटनात्मक फेरबदल ही प्रक्रिया आहे. आमच्या माजी जिल्हाध्यक्षांचा त्याग आणि परिश्रमही मोठे आहेत,” असं थोरात यांनी म्हटलं आहे.

या नियुक्त्यांमध्ये महत्त्वाची नियुक्ती औरंगाबाद जिल्हाध्यक्षांची आहे. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा, त्याचबरोबर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्षपदी प्रभारी नियुक्ती करण्यात आली. तब्बल वर्षभर जिल्हाध्यक्षपदाची प्रभारी सूत्रे माजी राज्यमंत्री अनिल राठोड यांच्याकडे होती. या काळात काँग्रेसनं लोकसभा व विधानसभा अशा दोन महत्त्वाच्या निवडणुका लढवल्या होत्या.