नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. त्यातच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा दिला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज बब्बर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मी आपल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा असल्याचे अशोक चव्हाण यांनी नमूद केले. तसेच यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. तसेच लवकरात लवकर मी राहुल गांधी यांची यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

राजीनामा देण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी एक ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या पराभवाला ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले होते.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात 2 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यानंतर आता यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. ज्यांना यापूर्वी उमेदवारी नाकारण्यात आली होती अशाच सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूरमधून विजय मिळवत काँग्रेसची लाज राखली आहे. त्यातच अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांसारख्या दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 9 ते 10 जागांचे नुकसान सोसावे लागले असल्याची कबुलीही अशोक चव्हाण यांनी दिली होती.