राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या ५०-६० हजारांवरून १० हजारांपर्यंत खाली आली आहे. मात्र, दररोज ही आकडेवारी सातत्याने कमी होताना न दिसता मध्येच वाढतानाही दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात झालेल्या करोना मृत्यूंची संख्या थेट ३८८ च्या घरात गेली आहे. सोमवारी हाच आकडा २०० इतका नोंदवण्यात आला होता. तिथे दुसरीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील कालच्या ८ हजार १२९ वरून जवळपास १२०० नी वाढून ९ हजार ३५० पर्यंत गेला आहे.

 

मंगळवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर १.९३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३८८ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली असून एकूण करोना मृतांचा आकडा आता १ लाख १४ हजार १५४ इतका झाला आहे. त्याचवेळी राज्यात ९ हजार ३५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५९ लाख २४ हजार ७७३ इतका झाला आहे. त्यापैकी सध्या राज्यात १ लाख ३८ हजार ३६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावीनं पुन्हा करून दाखवलं; सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या!

आज राज्यात करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार १७६ इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत करोनावर मात केलेल्या राज्यातल्या रुग्णांची संख्या ५६ लाख ६९ हजार १७९ इतकी नोंदवण्यात आली आहे.