महाराष्ट्रात सध्या लॉकडाउनचे निर्बंध लागू असून हा लॉकडाउन पुढचे किमान १५ दिवस तरी अजून वाढणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मात्र, त्यानंतर देखील राज्यात करोना रुग्णांची आकडेवारी खाली येताना दिसत नाहीये. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ६३ हजार ३०९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण अॅक्टिव करोनाबाधित रुग्णांचा आकडा ६ लाख ७३ हजार ४८१ वर गेला आहे. तसेच, आजपर्यंत राज्यात करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या देखील ४४ लाख ७३ हजार ३९४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात राज्यातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधून आणि कोविड केंद्रांमधून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा ही राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब ठरली आहे. २४ तासांत राज्यात ६१ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यातील मृतांचा आकडा आज पुन्हा प्रशासनाची आणि सरकारची देखील चिंता वाढवणारा ठरला. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ९८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात राज्यातील मृतांच्या आकड्यामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आजच्या संख्येनंतर राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता ६७ हजार २१४ इतका झाला आहे.

महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार नाही! राजेश टोपेंनी केलं जाहीर!

पुण्यात एकाच दिवसात ५८ रुग्णांचा मृत्यू!

पुणे शहरात दिवसभरात ३ हजार ९७८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख १० हजार ५०४ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तर याच दरम्यान ५८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ६ हजार ६६९ झाली. त्याच दरम्यान ४ हजार ९३६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख ५९ हजार ७७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

 

मुंबईत दिवसभरात सापजले ४ हजार ९६६ नवे बाधित

राजधानी मुंबईमध्ये दिवसभरात करोनाचे ४ हजार ९६६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ६ लाख ४० हजार ५०७ इतका झाला असून त्यापैकी ६५ हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्णांवर मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये आणि कोविड केंद्रांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात मुंबईत ७८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता १२ हजार ९९० इतका झाला आहे.