गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमवीर राज्याच्या काही भागामध्ये जनजीवन काही प्रमाणात का होईना, सुरळीत सुरू झालं असून काही भागांमधले निर्बंध वाढले आहेत. तर दुसरीकडे करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये देखील बदल घडताना दिसत आहेत. आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात एकूण १० हजार ६९७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारपेक्षा ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४८ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात १४ हजार ९१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं आहे. मात्र, तरीदेखील नव्या करोनाबाधितांची संख्या मात्र अजूनही १० हजारांच्या वर असल्यामुळे एकूण पॉझिटिव्हिटी रेट अद्याप नियंत्रणात आलेला नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या घटकांवरून निर्बंध कमी किंवा जास्त याविषयी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट कमी होणं ही महत्त्वाची बाब ठरली आहे.

 

दरम्यान, राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे तो म्हणजे राज्याचा मृत्यूदर. एकूण करोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे अद्याप राज्याचा मृत्यूदर १.८४ टक्के आहे. मात्र, दुसरीकडे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या ३०० च्या आसपास असल्यामुळे ती चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३६० मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात १ लाख ८ हजार ३३३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात आज ३३१ नवे रुग्ण, तर १० रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात ३३१ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ७३ हजार ८७० इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तर याच दरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ हजार ४६६ झाली आहे. त्याच दरम्यान ४५९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ६२ हजार २२२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.