महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. गुरुवारपर्यंत ४२३ वर असलेली संख्या आता ४९० वर पोहचली आहे. आज ६७ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्राचं टेन्शन आणखी वाढलं आहे. महाराष्ट्रात सापडलेल्या ६७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबईतले आहेत.

आज कुठे सापडले किती रुग्ण?
पुणे-९
नवी मुंबई-८
मुंबई-४३
पालघर-१
वाशिम-१
कल्याण-१
रत्नागिरी-१
एकूण ६७

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब मानली पाहिजे. स्वयंशिस्त पाळा, घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या या आणि अशा अनेक सूचना दिल्या जात आहेत. तसंच करोनाचा रुग्ण आढळला की तो भाग सीलही केला जातो आहे. तरीही करोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी आहे. अशात आता देशातलीही संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातही लॉकडाउन आहेच. लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा अन्यथा आज बाहेर फिरणारे उद्या रुग्णालयांमध्ये दिसतील असंही अजित पवार यांनी गुरुवारीच म्हटलं होतं. दरम्यान गेल्या २४ तासात महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ६७ ने वाढली आहे.

एकूण ४९० त्यापैकी ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात ३८ हजार ३९८  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.