गेल्या ३ दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर नवे करोनाबाधित सापडू लागले आहेत. त्यामुळे राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. १७ मार्च रोजी राज्यात २३ हजार १७९ करोनाबाधित सापडले होते. १८ मार्च अर्थात गुरुवारी ही संख्या वाढून २५ हजार ८३३ इतकी झाली. आज शुक्रवार १९ मार्च रोजी राज्यात दिवसभरात २५ हजार ६८१ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण अ‍ॅक्टिव्ह करोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ७७ हजार ५६० इतका झाला आहे. गेल्या ३ दिवसांत राज्यात तब्बल ७४ हजाराहून जास्त नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र, यासोबतच आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

मृतांचा आकडा देखील वाढताच!

दरम्यान, एकीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. १५ मार्च रोजी राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. १६ मार्च रोजी हाच आकडा थेट वाढून ८७ वर गेला. १७ मार्च रोजी पुन्हा ८४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला. १८ मार्च रोजी हा आकडा कमी होऊन ५८ पर्यंत खाली आला होता. पण आज पुन्हा तो वाढून ७० रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर वाढून २.२० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

 

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ

राज्यात नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक ३ हजार ६३ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. तर ७० मृतांपैकी मुंबईतल्या १० रुग्णांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात १ हजार ३२६ नव्या रुग्णांची भर पडली असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात २ हजार ८३४ रुग्णांची नव्याने भर पडली असून मुंबईपेक्षा जास्त म्हणजे १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

‘विनंती’ प्रयोगामुळे कमी झाल्या ‘रेमडेसिवीर’च्या किंमती! १ इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांत!

राज्यात पुन्हा लॉकडाऊन?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नंदुरबारमध्ये बोलताना करोनाच्या वाढच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हा एक पर्याय आहे, असं विधान केलं आहे. नियम पाळले नाहीत, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच, राज्य सरकारने नवी नियमावली देखील जारी केली आहे. त्यामुळे राज्यातले वाढते रुग्ण आणि मृतांचा वाढणारा आकडा सरकार आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरू लागला आहे.