गेल्या वर्षी देशात लॉकडाऊन लागू करण्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, अजूनही करोनाचा वाढता प्रादुर्भाव हीच समस्या प्रशासन आणि सरकारसमोर आहे. गेल्या काही महिन्यांत कमी झालेली रुग्णसंख्या आणि मृतांचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात करोनाची लाट आली आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ३१ हजार ८५५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. याआधी २१ मार्च रोजी राज्यात ३० हजार ५३५ रुग्ण सापडले होते. यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा २५ लाख ६४ हजार ८८१६ इतका झाला आहे. यापैकी २ लाख ४७ हजार २९९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवरून हळूहळू घसरत ८८.२१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

वाढत्या करोनाबाधितांसोबतच मृतांचा दररोज वाढणारा आकडा राज्यासाठी चिंतेची बाब ठरला आहे. २३ मार्च रोजी राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. आज हा आकडा खाली आला असला, तरी दिवसभरात तब्बल ९५ रुग्णांचे करोनाने बळी घेतले आहेत. त्यामुळे आज राज्यातल्या मृतांचा एकूण आकडा ५३ हजार ६८४ इतका झाला आहे. यासोबतच राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर आहे.

Mumbai Corona Update : मुंबईत आजपर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ! २४ तासांत ५ हजार १८५ नव्या रुग्णांची भर!

पुण्यात दिवसभरात ३ हजार ५०९ नवे रुग्ण!

दरम्यान, राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात मोठ्या संख्येने नवे करोनाबाधित सापडू लागले आहेत. मुंबईत आज दिवसभरात तब्बल ५ हजार १८५ नवे करोनाबाधित सापडले. तर पुण्यात हाच आकडा ३ हजार ५०९ च्या घरात आहे. मृतांचा आकडा मुंबईपेक्षाही पुण्यात जास्त आहे. पुण्यामध्ये आज दिवसभरात २४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा वाढून ५ हजार ११४ पर्यंत गेला आहे.