राज्यात एकीकडे पुन्हा कठोर लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना दुसरीकडे करोना रुग्णांची आणि करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यासोबतच, राज्यात दिवसभरात एकूण ६२ हजार ९७ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आजपर्यंत राज्यात सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ३९ लाख ६० हजार ३५९ इतका झाला आहे. त्यासोबतच एकूण मृतांचा आकडा देखील ६१ हजार ३४३ इतका झाला आहे.

 

राज्यात आज दिवसभरात एकूण ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढणं अपेक्षित आहे. मात्र, दुसरीकडे नवे करोनाबाधित सातत्याने वाढत असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सातत्याने खाली येऊ लागल्याचं गेल्या महिन्याभरात दिसून आलं आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.

राज्यात नेमका कधीपासून लॉकडाउन लागू होणार? परिवहनमंत्री अनिल परब यांची दिलं स्पष्टीकरण!

पुण्यात दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ५ हजार १३८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ३ लाख ७६ हजार ९६२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ६ हजार २१८ झाली. त्याच दरम्यान ६ हजार ८०२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख १७ हजार ७६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

SSC Exams – राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्येही रुग्ण वाढले

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार ५६३ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ५० जण बाधित रुग्ण आढळले असून २ हजार २०६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर ५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी ३२ जण महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ८८ हजार ५८८ वर पोहचली असून पैकी, १ लाख ६२ हजार ८७० जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ३५७ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.