राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. याआधी देखील राज्यात कठोर निर्बंध लागू असतानाही करोनाचे रुग्ण आणि मृत्यू नियंत्रणात येत नसल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कठोर लॉकडाउन लागू होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं असताना दुसरीकडे राज्यात करोनाचं भीषण रुप दिवसेंदिवस अधिकच भीषण होऊ लागलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६१ हजार ९११ इतका झाला आहे. तर राज्यातला मृत्यूदर १.५४ टक्के इतका नोंद झाल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

 

मृतांच्या आकड्यासोबतच नव्या करोनाबाधितांचे आकडे देखील रोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार ४६८ नवे करोनाबाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. २४ तासांत राज्यात ५४ हजार ९८५ करोना रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. मात्र, त्यामुळे रिकव्हरी रेटमध्ये अजूनही वाढ झाल्याचं दिसून येत नाही. राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ८१.१५ इतकाच आहे. आत्तापर्यंत राज्यात ३२ लाख ६८ हजार ४४९ करोनाबाधित बरे होऊन घरी सुखरूप परतले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्येही रुग्णवाढ कायम!

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार ३८५ बाधित रुग्ण आढळले असून २ हजार ३७६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर ५५ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी ३२ जण हे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ९० हजार ९७३ वर पोहचली असून पैकी, १ लाख ६५ हजार २४६ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार १७१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.