देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी राज्यात ११ हजार १११ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात २८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी उपचारानंतर तब्बल ८ हजार ८३७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

रविवारी राज्यात ११ हजार १११ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ९५ हजार ८६५ वर पोहोचली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ४ लाख १७ हजार १२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २० हजार ०३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईत १ हजार ०१० रुग्ण

मुंबईत रविवारी १ हजार ०१० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ७१९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख २८ हजार ७२६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ लाख ३ हजार ४६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १७ हजार ८२८ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ७ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.