News Flash

…त्यासाठी संपूर्ण मुंबईची करोना दफनभूमी करायची; शिवसेनेकडून भाजपाचा समाचार

"करोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला, तो..."

संग्रहित छायाचित्र/पीटीआय

राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, करोनाचं संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. करोनाच्या वाढत्या संकटासाठी भाजपाकडून राज्य सरकारला दोषी ठरवलं जात आहे. विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “करोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला, तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

सरकारनं हात धुवा हे सांगण्याशिवाय काय केलं असं म्हणत भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका केली जात आहे. त्याचबरोबर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचा आरोपही भाजपाकडून केला जात आहे. भाजपाकडून होणाऱ्या आरोपांचा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेत प्रतिहल्ला केला आहे. “मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजपा’ करोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘करोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत. आताही भाजपातर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला हे खरे. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. करोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात करोनाचे संकट वाढते आहे याचे भान तरी त्यांनी ठेवावे,” अशा शब्दात शिवसेनेनं राज्यातील भाजपा नेत्यांना सुनावलं आहे.

“दिल्ली पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’च्या दिशेने निघाली आहे. दिल्लीतील लग्नसमारंभांवर बंधने आलीच आहेत, पण दिल्लीची लाट मुंबईपर्यंत पोहोचू नये यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर निर्णयांकडे वळत आहे. मुंबई-दिल्ली विमानसेवा, मुंबई-दिल्ली रेल्वे सेवा पुन्हा बंद करावी का, यावर राज्य प्रशासन विचार करीत आहे. याचाच अर्थ परिस्थिती गंभीर व हाताबाहेर जाताना दिसत आहे. दिल्लीत रोज साधारण दीडशे मृत्यू होत आहेत व सात-आठ हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा आकडा इस्पितळ, कोविड सेंटरमधला आहे. भाजपाचे अनेक खासदार व केंद्रीय मंत्री कोविडने आजारी पडले. एक केंद्रीय मंत्री सुरेश आंगडिया तर कोरोनाचे बळी ठरले. रामविलास पासवानही गेले. अनेक खासदार करोनाग्रस्त झाले. याची जबाबदारी कोणी घ्यायची? गुजरात, हरयाणा, राजस्थान, मणिपूर या चार राज्यांत केंद्राने कोविड पाहणीसंदर्भात खास पथके तैनात केली. याचा अर्थ या राज्यातील स्थिती चांगली नाही. महाराष्ट्राने स्थिती नियंत्रणात आणली तर विरोधी पक्षाचे एकच तुणतुणे वाजत आहे, हे उघडा आणि ते उघडा. म्हणजे कोरोनाची महामारी पसरू द्या व त्याचे खापर सरकारवर फोडून आत्म्यास थंडक पोहोचू द्या. शाळा, मंदिरे, लोकल उघडा असे सांगणाऱ्यांसाठी हा धडा आहे. राज्यातील अनेक शिक्षक व विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले आहेत. मंदिरांबाबत नियम पाळले नाही तर देवही परिस्थिती नियंत्रणात आणू शकणार नाही. त्यात विरोधी पक्ष ज्या बेजबाबदारपणे वागत आहे. त्यामुळे स्मशानात लाकडांचा साठा जास्तच करावा लागेल व भाजपाची तीच अघोरी इच्छा दिसत आहे. उठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे? भाजपाला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे व ते त्यांचे अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची करोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापड विजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे,” अशी टीका शिवसेनेनं भाजपावर केली आहे.

“वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झालं”

“दुसऱ्याच्या पराभवात एक वेळ आनंद मानता येईल, पण करोना महामारी संकट वाढविण्यास हातभार लावायचा. ते वाढले की त्यावर सरकारला कोंडीत पकडायचे, असा विचार करणे म्हणजे आपल्याच प्रजेला डोळ्यादेखत महामारीच्या कत्तलखान्यात पाठविण्यासारखे आहे. दिल्लीत आता ‘मास्क’ सक्तीचा. न घालणाऱ्यांना दोन हजारांचा दंड असा नियम लागू केला आहे. महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजपा नेते प्रश्न विचारतात की, ”हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?” त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे. मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? ‘करोना महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या आसपास वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे हा सुद्धा अपराध ठरतोय. कारण पंतप्रधान फक्त भाजपाचे किंवा भाजपशासित प्रदेशांचे असा नवा पायंडा या मंडळींनी पाडला आहे. तो लोकशाही, स्वातंत्र्य व हिंदुस्थानच्या संघराज्यास घातक आहे. देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, कश्मीरातील रक्तपात, चीनची लडाखमधील घुसखोरी असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व करोना महामारीसारखे विषय वाढवले जात आहेत काय? पंतप्रधान मोदी हे जागतिक ‘जी-२०’ संमेलनात त्यांनी कळवळून सांगितले, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर करोना हेच सगळ्यात मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व करोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. करोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी समजून घ्यावे,” अशा शब्दात शिवसेनेनं भाजपा नेत्यांवर निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 7:41 am

Web Title: maharashtra coronavirus sanajay raut devendra fadnavis maharashtra bjp protest narendra modi thackeray sarkar bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रत्नागिरी, रायगड जिल्ह्य़ातील शाळा आजपासून सुरू
2 पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीतही निर्बंध
3 धोक्याची घंटा! राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली
Just Now!
X