दिवाळीपूर्वी कमी झालेला करोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येनं ५ हजारांच्या सरासरीनं उसळी घेतल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. “राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला जातोय. आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्त्वाचं आहे,” अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
“राज्यात करोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील. मुंबई कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील,” असं वडेट्टीवार म्हणाले.
“राज्यात करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं करोनाचा अटकाव केला गेला, तसं काम कुठेही झालेलं नाही. मुंबईत एवढी गर्दी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं आहे. दाट वस्ती असलेल्या भागातील कामाचं केंद्र सरकारनेही कौतुक केलं. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचं आणि उपाययोजनांचंही कौतुक केलं आहे,” असं वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा- “ग्रिड फेल करता करता…”; माजी ऊर्जामंत्र्यांची ठाकरे सरकारवर टीका
‘भाजपाचं आंदोलन म्हणजे ढोंगीपणा’
वीजबिलाच्या मुद्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून लावून धरण्यात आलेल्या वीजबिलाच्या मुद्यावरही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. “वीजबिलाच्या मुद्द्यावरील भाजपाचं आंदोलन म्हणजे ढोंगीपणा आहे. त्यांच्या सरकारच्या काळातच वीज थकबाकी वाढली. त्यामुळेच ऊर्जा विभागाची स्थिती बिकट झाली,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 23, 2020 2:29 pm