राज्यातील रुग्णवाढीचा वेग कायम असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसाला १५ ते २५ हजारांच्या दरम्यान करोना रुग्ण आढळून येत असून, रविवारी राज्यातील रुग्णसंख्या १३ लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत राज्यात ३५ हजारांपेक्षा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत नऊ हजारांच्या जवळपास रुग्णांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे.

राज्यात आज दिवसभरात १८ हजार ५६ नवीन करोना रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ३८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरी दिवसभरात १३ हजार ५६५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नवीन रुग्णांची भर पडल्यानं राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३ लाख ३९ हजार २३२ इतकी झाली आहे. यात ३५ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १० लाख ३० हजार १५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात २ लाख ७३ हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

मुंबईतील करोनाचा प्रसारही नियंत्रणात आला नसल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. दिवसभरात मुंबईत २ हजार २६१ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६ हजार ५९३ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत ८ हजार ७९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.