धोम-वाई हत्याकांडातील सहभागामुळे मला पश्चात्ताप होत आहे. मला आता प्रायश्चित्त घ्यायचे असल्याने मी माफीचा साक्षीदार  होण्यास तयार असल्याचे ज्योती मांढरे हिने सातारा न्यायालयात सांगितले. तर, ज्योतीला माफीचा साक्षीदार करु नये असे संतोष पोळला म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला.

सातारा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्या न्यायालयात शनिवारी सुनावणी झाली. अ‍ॅड. उज्वल निकम यांनी सातारा येथे याकामी हजेरी लावली. सुनावणीसाठी बोगस डॉक्टर संतोष पोळ व ज्योती मांढरेला न्यायालयात आणले होते. सकाळी साडेअकरा वाजता अ‍ॅड. निकम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. क्रूरकर्मा बोगस डॉ.संतोष पोळने २००३ पासून २०१६ पयर्ंत १३ वर्षांच्या काळात सहा खून करुन ते मृतदेह पुरल्याचा छडा पोलीसांनी लावला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. डॉ. संतोश पोळ व त्याची साथीदार ज्योती मांढरे यांना पोलिसांनी अटक केली. वाई पोलिसांनी तपास करुन सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सहा पकी तीन गुन्हयात तिचा सहभाग असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले. हा खटला परिस्थितीजन्य असल्याने ज्योती मांढरे हिला डॉ. पोळ हा मुख्य संशयित आरोपी असल्याने दोघांची भेट झाली तर तो ज्योतीवर दबाव आणू शकतो. यामुळे या दोघांना कारागृह प्रशासनाने भेटू देऊ नये असा युक्तिवाद केला.

यावर ज्योती मांढरेला अ‍ॅड. निकम यांनी विचारले, की तुला या प्रकरणाची न्यायालयाला काय माहिती सांगावयाची आहे. आपला या हत्याकांडात सहभाग होता. त्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे. आपल्याला रात्रभर झोप येत नाही. यामुळे खुनांच्या घटनेची माहिती न्यायालयाला सांगायची आहे. या वेळी अ‍ॅड. निकम यांनी या खटल्याच्या अनुषंगाने न्यायालयाला विविध घटनांचे दाखले दिले. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. श्रीकांत हुडगीकर यांनीही यावेळी युक्तिवाद केला. यानंतर ज्योतीला माफीचा साक्षीदार करु नये असे म्हणण्याचा कोणताही अधिकार संतोष पोळला नसल्याचे अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले. यानंतरची सुनावणी १३ फेबुवारी रोजी होणार आहे.