करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असला तरीही करोनाशी लढण्यासाठीची लस जास्तीत जास्त नागरिकांना दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक लसीकरण करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. नुकताच राज्याने तीन कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचा टप्पा पार केला आहे.

राज्याने आज दुपारी दोन वाजेपर्यंत तीन कोटी २७ हजार २१७ नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देत हा विक्रम केला आहे. तर काल दिवसभरात राज्यातल्या पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या दोन कोटी ३९ लाख ९३ हजार ५९० होती तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ५७ लाख ३० हजार ४७ इतकी होती. आज राज्यातल्या लस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी २७ हजार २१७ वर पोहोचली आहे.

हेही वाचा- राज्याचा लसविक्रम

करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकाची नोंद केली. दिवसभरात राज्यात ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस देण्यात आली. यामुळे लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळाल्याचे चित्र आहे.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांचे लसीकरण करून उच्चांक नोंदविण्यात आला होता. बुधवारी दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.