राज्य सध्या भूस्खलन, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींशी झगडत आहे. काहींनी यात जीव गमावला, तर काहींनी जीवापाड प्रेम असलेली माणसं. राज्यात दुःखाचं, काळजीचं वातावरण असलं तरी त्यात आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्यात करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे.  अशा प्रकारचा विक्रम करणारं महाराष्ट्र हे पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे करोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत नागरिकांचं आणि प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे.

आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे.
लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra crossed new limit of vaccinationg over 1 crore people first and only state in india vsk
First published on: 26-07-2021 at 17:17 IST