24 October 2020

News Flash

नवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मुख्यालय उभारण्यात येणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबईमधील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय उभे राहणार आहे. यासाठी जागा ताब्यात मिळाली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मुख्यालय उभारण्यात येणार असून राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी आधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला तसेच अशा गुन्ह्यांना आळा घालण्यास गती मिळणार आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच गुन्ह्यांच्या शोधासाठी महाराष्ट्र सायबरची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबरकडून सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी महापे येथील जागेची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने ही जागा ‘महाराष्ट्र सायबर’च्या ताब्यात दिली आहे. या ठिकाणी सायबर सुरक्षा प्रकल्पाचे चार मुख्य केंद्रं सुरू करण्यात येणार असून याद्वारे गुन्हे अन्वेषणासाठीचे तांत्रिक सहाय्य केंद्र, गुन्हे अन्वेषणासाठी आवश्यक तंत्रज्ञान सहाय्यक विश्लेषण केंद्र, सर्ट-महाराष्ट्र आणि प्रशिक्षण केंद्र आदींचे कामकाज येथून होणार आहे.

सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात अधिक परिणामकारक, सुसूत्रता व अत्यंत कमी वेळात गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांबरोबर विविध कार्पोरट कंपन्यांनाही सायबर गुन्ह्यांविरुद्ध मदत होणार आहे. यासोबत सायबर सुरक्षिततेत देशात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यास मदत होणार आहे. यामुळे सायबर सुरक्षित वातावरणामुळे नवनवीन उद्योग राज्यात येण्यास उत्सुक राहतील.

महाराष्ट्र सायबरच्या वतीने राज्यात ५१ सायबर प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. तसंच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ४३ सायबर पोलीस स्थानकं सुरू करण्यात आली आहेत. या सर्व प्रयोगशाळा व सायबर पोलीस ठाण्यांना विविध तंत्रज्ञान व तांत्रिक सहाय्य या सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयातून पुरवण्यात येणार आहे. सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे राज्यातील पोलीस दलास अत्याधुनिक सायबर प्रणाली व भविष्यात येणारे आधुनिक यंत्रणा पुरविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी आज महापेतील मिलेनियम बिझनेस पार्कमधील इमारत क्रमांक १०२ व १०३ मधील जागा ताब्यात घेतली. “महापे औद्योगिक वसाहतीमधील बिझनेस पार्कमध्ये महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी जागा मिळाल्यामुळे डिजिटल युगात उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सायबर सज्ज झाली आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास वेगाने होण्यास मदत होणार आहे. तसेच येथे उभारण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रणेमुळे सायबर हल्ल्याला वेळीच आळा घालता येईल”, असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 3:37 pm

Web Title: maharashtra cyber security project headquarter will be in navi mumbai sgy 87
Next Stories
1 मुंबईत तीन मेट्रो मार्गांना मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
2 मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात!
3 मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार
Just Now!
X