15 October 2019

News Flash

कोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा

जाणून घ्या तुमच्या घरी येणार का मुबलक पाणी की जाणवणार पाणीटंचाई?

मोडक सागर धरण (संग्रहित छायाचित्र)

पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत. जुलैअखेरपर्यंत महाराष्ट्राचा एकूण जलसाठा हा ५६.९२ टक्के इतका झाला आहे. त्यामध्ये ४९.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. ७ जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा जास्त तर १७ जिल्ह्यात ३० टक्के पेक्षा कमी आणि १२ जिल्ह्यात ३० ते ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी जुलैअखेरीस ४६.२६ टक्के राज्यातील धरणांची पाणीसाठ्याची सरासरी स्थिती होती.

राज्यातील सहा विभागापैकी मराठवाडा विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी २०.२७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कोकण विभागात सर्वात जास्त ८५.२९ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील पंधरा धरणे ८० ते १०० टक्के भरली असून ती पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. यातील चार धरणे शंभर टक्के भरली आहेत.

राज्यातील सहा विभागातील पाणी टक्केवारी

कोकण – ८५.२९ टक्के
पुणे – ६६.३४ टक्के
नाशिक – ४५.७६ टक्के
नागपूर – ३६.७९ टक्के
अमरावती – २७.३० टक्के
मराठवाडा – २०.२७ टक्के

औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वाशिम, यवतमाळ या १७ जिल्ह्यातील सरासरी ३० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अहमदनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यात ३० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. कोल्हापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदूर्ग, ठाणे या सात जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.

विविध प्रकल्पांचा विचार केल्यास औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये सर्वाधिक ६६०.९५ द.ल.घ. मीटर जलसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यात ३८६८.१९ द.ल.घ. मीटर तर कोल्हापूर जिल्ह्यातील जल प्रकल्पामध्ये एकूण सरासरी १४८९.४५ दश लक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी १०५ टिएमसी क्षमता असलेले सातारा-कोयना धरण ७८.८१ टक्के, ७६.६५ टिएमसी क्षमता असलेले पैठण-जायकवाडी धरण ३०.१२ टक्के तर सोलापूर येथील ११७ टिएमसी क्षमता असलेले उजनी धरण ३०.३० टक्के भरले आहे.
राज्यातील मोठे प्रकल्पात ५४.८८ टक्के, मध्यम प्रकल्पात ४१.१७ टक्के आणि लघु प्रकल्पात ३०.३७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे एकूण सरासरी ५६.९२ टक्के पाणीसाठा आहे.

९० टक्के पेक्षा जास्त भरलेली राज्यातील धरणे (आकडे टक्केवारीत)

यवतमाळ – पुस  ९३. १५, ठाणे – निम्रचौंडे  १००, पालघर -कवडसा  १००, नाशिक – भावली ९९. ५८, कोल्हापूर -तुळशी ९६. ४७, तिल्लारी – धामणे ९०, राधानगरी ९८. ७५, पुणे – खडकवासला ९८. ४१, चासकमान ९७.९२, पवना ९५.०७, पानशेत १००, येडगाव ९५. १५, सातारा – वीर ९५. ८२ इतर बारवी १००, तानसा ९९.२९, मोडकसागर ९९.९७, मध्य वैतरणा ९४.८८

First Published on July 27, 2018 1:22 am

Web Title: maharashtra dam water reservoirs water level various divisions