News Flash

‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा

सिम्बायोसिस संस्थेतील विद्यार्थ्यांनी जलमित्र होऊन श्रमदान करावे असे आवाहन करण्यासाठी आलेल्या आमीर खान याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अभिनेता आमीर खान याचे आवाहन

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशनने सुरू केलेल्या कामामध्ये सहभाग घेत महाराष्ट्र दिनी (१ मे) शहरवासीयांनी मोठय़ा संख्येने जवळच्या खेडय़ात जाऊन श्रमदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेता आणि पानी फाउंडेशनचा संस्थापक आमीर खान याने शनिवारी केले. पानी फाउंडेशनचे जलमित्र होऊन दुष्काळविरोधाच्या प्रयत्नांमध्ये सामील होण्यासाठी गेल्या तीन आठवडय़ांत एक लाख लोकांनी नोंदणी केली आहे. ही संख्या वाढेल, असा विश्वास आमीर खान याने व्यक्त केला.

सिम्बायोसिस संस्थेतील विद्यार्थ्यांनी जलमित्र होऊन श्रमदान करावे असे आवाहन करण्यासाठी आलेल्या आमीर खान याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पानी फाउंडेशनच्या महाश्रमदान मोहिमेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण या वेळी करण्यात आले. त्या प्रसंगी आमीर खान याने पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रसिद्ध अभिनेता गिरीश कुलकर्णी, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते या वेळी उपस्थित होत्या.

राज्यातील दीड हजार गावांमध्ये गावकऱ्यांच्या साथीने पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. यामध्ये शहरातील अनेकांनी योगदान देण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे १ मे रोजी आपल्या जवळपासच्या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांच्या साथीने तीन तासांचे श्रमदान करून महाराष्ट्र दिन साजरा करावा, अशी आमची अपेक्षा आहे. लोकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात अशा दोन टप्प्यातील वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्यांना श्रमदान करणे शक्य नाही त्यांनी जेसीबी आणि पोकलेन मशिनचे भाडे दान करून योगदान द्यावे. चित्रपटसृष्टीतील कलाकार या श्रमदानामध्ये सहभागी होतील, अशी आशा आहे. प्रत्येक गाव पाणलोट कार्यक्रम राबवू शकले, तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त होऊ शकेल, असा विश्वास असल्याचे आमीर खान याने सांगितले.

पानी फाउंडेशनने बीड जिल्ह्य़ात काम सुरू केले, तेव्हा नवलकिशोर राम तेथे जिल्हाधिकारी होते. आता ते पुण्यामध्ये आम्हाला सहकार्य करीत आहेत, याचा आनंद असल्याचे आमीर खान याने सांगितले.

पानी फाउंडेशनची गरज भासणार नाही

महाराष्ट्रातील लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. आपली पाण्याची अडचण ते स्वत:हून सोडवतील या विषयी मला विश्वास वाटतो. त्यामुळे आगामी पाच वर्षांनंतर पानी फाउंडेशनची गरज भासणार नाही, असे आमीर खान याने सांगितले. केवळ ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्रातील कामावर आम्ही थांबणार नाही. भविष्यात शहरातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही आमीर खान याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:25 am

Web Title: maharashtra day celebration by shramdaan sasy aamir khan
Next Stories
1 दीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च
2 ई-लर्निग प्रणाली पुन्हा वादात
3 सुरक्षा हमीनंतर ‘बीआरटी’ वर सेवा
Just Now!
X