अलिबाग येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
रायगड जिल्ह्य़ात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६वा वर्धापन दिन समारंभ पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अनुपस्थितीत पार पडला. काही अपरिहार्य कारणामुळे चक्क ध्वजारोहण समारंभालाच पालकमंत्री अनुपस्थित राहिल्याचे या वेळी सांगण्यात आले. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस मानवंदना स्वीकारली.
महाराष्ट्र दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचे पोलीस परेड मदानावर आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे गहनिर्माण, खनिकर्म आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता उपस्थित राहणार होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ, ध्वजवंदन आणि संचलन समारंभ पार पडणार होता, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे पालकमंत्री मेहता या समारंभास अनुपस्थित राहिले. ध्वजारोहणाला पालकमंत्री गरहजर राहण्याची ही जिल्ह्य़ातील पहिलीच वेळ होती.
त्यामुळे जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने खोपोलीचे पोलीस निरीक्षक सावता िशदे, पोलीस हवालदार (मुख्यालय), श्रीकांत म्हात्रे, माणगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे,पोलीस निरीक्षक (अलिबाग) तुकाराम पवळे, दिघी सागरी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक संजय मोगले, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, आदर्श तलाठी पुरस्कार विजेते सी. एस. राऊत यांचा समावेश होता. पोलीस दलातील विविध पथकांसह होमगार्डच्या पथकांनी या वेळी शानदार संचलन केले.
दरम्यान, पालकमंत्र्यांची गरहजेरीचे नेमके कारण कळू शकले नाही. जिल्हा प्रशासनाने काही अपरिहार्य कारणाने पालकमंत्री येऊ शकले नाही असे सांगितले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्याकडेही याबाबत विचारणा केली असता प्रशांत ठाकूर बठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.