राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं विधान केलं आहे. यावरुन शिवसेनेने नाना पटोले यांना टोला लगावताना राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल असा सूचक इशारा दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला शरद पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना एकत्र काम करावं लागेल असं म्हटलं होतं. यामुळे पुढील निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंना अजित पवारांनी फटकारलं; म्हणाले…

आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत जाणार की स्वबळावर असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा कोणाकोणाची आघाडी आणि कोणाची युती हे पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थित सांगतो. आता तसलं काही डोक्यात नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे, किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून जी जबाबदारी स्वीकारली आहे ती व्यवस्थित पार पाडण्याचं काम सुरु आहे”. अजित पवार यांनी यावेळी शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शरद पवारांनी दिले होते सूतोवाच

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करीत आहे. हे सरकार पाच वर्षे टिके ल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील, असा विश्वाास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहील, असे सूतोवाच वर्धापन दिनाच्या वेळी केलं होतं.

‘मी पुन्हा येईन’ म्हणणारेही आले नाहीत, नुसतं बोलून व डोलून काय होणार?; शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला

नाना पटोलेंनी काय म्हटलं आहे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. परंतु पटोले यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल, असे भाकीत व्यक्त करीत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे.

तर शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल – शिवसेना

स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे असा सूचक इशारा शिवसेनेने सामना संपादकीयमधून दिला आहे.