मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपा खासदार संजय काकडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारलं आहे. उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत असल्याचं वक्तव्य संजय काकडेंनी केलं आहे. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांची विश्वासार्हता किती अशी विचारणा केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात करोना आढावा बैठक पार पडल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी संजय काकडे यांच्या वक्तव्यासंबंधी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही”.

संजय काकडे काय म्हणाले आहेत –
संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहिती आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक वक्तव्यं पहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत,” असा दावा संजय काकडे यांनी केला आहे.