राज्यात करोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असं आवाहन वारंवार राज्य सरकारकडून केलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील यावेळी लाट नाही तर त्सुनामी येईल अशी भीती व्यक्त केली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको असं ते म्हणाले आहेत. “गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळला,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं. यावेळी अजित पवारांनी पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे सांगत आपण उपमुख्यमंत्री पदावर समाधानी असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा- “आमचं चुकलंच,” अजित पवारांनी मान्य केली चूक

“अवघ्या जगासमोर करोनाचं आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ करोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचं आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “राज्य सरकारला लॉकडाउन लावण्यापासून रोखा”

अजित पवारांनी यावेळी आपण अनुदानाचे पैसे जमा झाल्याची ऑर्डर घेऊन आल्याची माहिती देताना आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याचं मान्य केलं. “मागे राज्याचे प्रमुख आले तेव्हा पंढरपूरसाठी पाच कोटींचा चेक दिला होता. पण ते पैसे जमा झाले नव्हते. ही आमची चूक आहे. जेव्हा आपण चेक देतो तेव्हा पैसे जमा झाले पाहिजे. त्यामुळे कालच ऑर्डर काढून, ते पैसे जमा करुन जायचं असं अर्थमंत्री या नात्याने मी ठरवलं होतं. नगराध्यक्षांकडे ती ऑर्डर सुपूर्त केली आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

संपूर्ण टाळेबंदी नाही, मात्र भटकंती करणाऱ्यांना चाप
लोक ऐकणार नसतील तर टप्प्याटप्प्याने पुन्हा निर्बंध लागू केले जातील असा इशारा याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. भटकंती करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार असून पुन्हा टाळेबंदी होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

आणखी वाचा- देशाच्या तुलनेत महाराष्ट्र करोना रुग्णांच्याबाबतीत ‘सेफ झोन’मध्ये- राजेश टोपे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी पुन्हा टाळेबंदीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरू नका असे राज्यातील जनतेला आवाहन केलं होतं.” राज्यातील स्थिती सध्या समाधानकारक असून करोनाबाधितांची संख्याही कमी होत आहे. शेजारील गोवा, केरळ, गुजरात, दिल्ली राज्यांतील करोनाबाधितांची संख्या वाढत असून देशाच्या तुलनेत राज्याचा रुग्णवाढीचा दर खूप कमी आहे. मात्र करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यात करोना चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं,” टोपे यांनी सांगितलं.

“दिवाळीनंतर आता करोनाबाधितांची संख्या वाढत असून लोकांनी पुरेशी दक्षता घेतली नाही, लोक ऐकणार नसतील तर टप्प्याटप्प्याने काही निर्बंध लावले जातील. रात्रीच्या फिरण्यावर तसेच बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्याबाबत विचार सुरू असून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचंही,” टोपे यांनी सांगितले.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar on covid 19 lockdown sgy
First published on: 26-11-2020 at 13:46 IST