मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचा आदेश देत ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही विकासकामात अडथळा आणू नये असं स्पष्ट मत मांडलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील सहकारी, अधिकाऱी, कायदा विभाग, अॅटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतील. कायदा आणि नियमाला धरुन जी सकारात्मक भूमिका असेल ती आम्ही घेऊ. एखाद्या न्यायालायने अशा पद्धतीचे आदेश दिल्यानंतर त्यावर अपील करण्याची व्यवस्था आपल्या कायदा, नियम आणि घटनेत आहे. त्याचाही विचार केला जाईल. काम सुरु करण्यासाठी जे करावं लागेल याचा विचार केला जाईल”.
ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर बोलताना ते म्हणाले की, “केंद्र किंवा राज्य सरकार असो कोणीही विकासकामात अडथळा आणू नये. मी शरद पवारांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिली आहे. मी पण ३० वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी कधीही विकासकामात राजकारण आणत नाही. आम्ही मदतच करत असतो. पण हा निर्णय खूपच जिव्हारी लागलेला दिसतोय आणि त्यामुळेच केंद्राने टोकाचं पाऊल उचललं आहे”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 12:35 pm