अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या उप-मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजितदादांनी शनिवारी बारामतीत आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत उपस्थितांची मनं जिंकली. ते माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांनी भाजपाला साथ देत, उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या नाट्याचाही त्यांनी यावेळी उलगडा केला.

“आम्ही पण चारवेळा उप-मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. कसं का होईना, पण चारवेळेस उप-मुख्यमंत्री झालो ना…भलेही माझ्या पद्धतीने झालो असेल. पण गंमतीचा भाग सोडा, म्हटलं साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले तर आपण चारवेळा उप-मुख्यमंत्री होऊ”, यानंतर अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उपस्थित सभासदांकडे पाहिलं आणि सभासदांमध्ये एकच हास्याचा स्फोट झाला.

यावेळी साखर कारखान्याच्या छोट्या-छोट्या प्रश्नांवर अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहेत. तर नुकतेच काहि महिन्यांपूर्वी त्यांनी बंड करत भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अवश्य वाचा – कही पे निगाहे, कही पे निशाना ! मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये फटकेबाजी