News Flash

शेतकऱ्यांची ‘दिवाळी’, कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात

सामाजिक न्याय विभागाचा एकही पैसा कर्जमाफीसाठी घेतला नाही

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून सुरुवात झाली.

सात बारा कोरा झाल्याने आता कर्ज मिळू शकेल…. आम्हाला ट्रॅक्टर आणि गाय-म्हशींसाठी कर्ज मिळेल आणि शेतीत सुधारणा होईल…. ही प्रतिक्रीया आहे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शैला कदम यांची. शैला कदम यांच्यासारख्या सुमारे आठ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पडला. या प्रसंगी काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यावर मनोगत मांडले. निसर्गाची अवकृपा झाल्याने उत्पन्न घटले, त्यामुळे कर्ज परत करता आले नाही, शेतीमधील भांडवल गुंतवणुकीचे मार्ग बंद झाले, पण आता कर्जमाफी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा विश्वास पालघरमधील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील २० लाख हेक्टर जागा सिंचनाखाली आणली, असा दावा त्यांनी केला. शेतीचा विकास दर उणे होता, मात्र आता  तो १२ ते १२.५ टक्क्यांवर पोहोचला, उत्पन्नही ४० हजार कोटी रुपयांनी वाढले असा दावा त्यांनी केला. यापूर्वीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली, मात्र शेतीमध्ये गुंतवणूक न केल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. मात्र आम्ही कर्जमाफी करतानाच शेतीमध्ये गुंतवणूक करत आहोत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.

कर्जबाजारी शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा कर्ज मिळत नाही, मग तो सावकाराच्या दुष्टचक्रात अडकतो. म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जाची घोषणा केली, त्यावेळी आमच्यावर टीका झाली. पण जनतेचा पैसा वाचला पाहिजे, बँकांच्या चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नये यासाठीच ऑनलाईन अर्जाचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत शेतकरी असू शकतात, पण त्यांचे प्रमाण कमी असेल. मात्र यादीत मुंबईतही ८१३ शेतकरी असल्याचे समोर आले. याची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांनाही प्रोत्साहन देण्याची गरज होती, त्यांना २५ हजाराची प्रोत्साहन रक्कम देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. निकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती व जमातीच्या निधीचा वापर केल्याचे वृत्त होते. मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा फेटाळला. सामाजिक न्याय विभागाचा एकही पैसा कर्जमाफीसाठी घेतला नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 2:34 pm

Web Title: maharashtra diwali gift for farmers farm loan waiver benefits cm devendra fadnavis shetkari sanman yojana
टॅग : Farmers
Next Stories
1 लातूरचे ग्रंथालय अधिवेशन : तेव्हा समाधान, आता पश्चाताप!
2 पंकजा आणि धनंजय यांच्यात अशीही स्पर्धा!
3 शेतकरी महिलांचा दिशादर्शक ‘कॉटन टू क्लॉथ’ प्रकल्प
Just Now!
X