बुलढाणा जिल्ह्य़ातील दुष्काळमुक्तीच्या कार्याला जैन संघटनेचे बळ 

वातावरणातील बदल आणि अनियमित पावसामुळे देशापुढे दुष्काळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भीषण दुष्काळाची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या याच प्रयत्नांना बुलढाणा जिल्ह्य़ात भारतीय जैन संघटनेची साथ मिळाली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियानांतर्गत राज्यातील एका दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ाची निवड करण्यात येत असून, त्यामध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्य़ाची निवड झाली. पाणी साठविण्याच्या क्षमता व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्य़ातील दुष्काळमुक्तीच्या कार्याला ‘बीजेएस’चे बळ मिळाले असून, सामूहिक प्रयत्नांमधून मोहिमेला गती प्राप्त झाली आहे.

लहरी पावसामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ांना दर वर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीला सिंचनाची सोय तर मिळत नाहीच, शिवाय पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागते.  बुलढाणा जिल्ह्य़ाला सदैव दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असते. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाने गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली. भारतीय जैन संघटनाद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत बुलढाणा जिल्हा सुजलाम सुफलाम मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या मोहिमेमध्ये जैन संघटनेने १२४ नवीन जेसीबी मशीन व १० पोकलेन मशीन लावल्या आहेत. या मोहिमेत दोन हजार १९१ छोटय़ा-मोठय़ा पाणी साठवण्याच्या प्रकल्पांमधून तीन कोटी ८१ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्य़ात येत आहे. जिल्ह्य़ातील नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी या मोठय़ा प्रकल्पांसह ज्ञानगंगा, पलढग, मन, तोरणा, उतावळी, मस, कोराडी, या मध्यम प्रकल्पांमधील गाळ काढण्यात येत आहे. प्रकल्पामधून काढलेला गाळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा हा गाळ टाकून आपली शेतजमीन सुपीक करण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच जिल्ह्य़ात पाणी, माती, शेती व पीक यासंदर्भात जनजागृती करून गावकऱ्यांची क्षमताबांधणी करण्यात येत आहे. या कामांवरती जैन संघटना व प्रशासकीय अधिकारी एकत्रितरीत्या देखरेख करीत असून एकाच वर्षांत ५० हजार एकर जमीन सुपीक करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेमुळे जलाशयांमधील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात येत असल्याने शेती सुपिक होण्याचे भरीव काम देखील मार्गी लागणार आहे. संपूर्ण देशातील महत्त्वाकांक्षी व दुष्काळमुक्तीकडे पाऊल टाकणारा हा अभिनव उपक्रम ठरला असून, यामुळे बुलढाणा जिल्हा निश्चितच सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तीन कोटी ८१ लाख क्युबिक मीटर गाळ निघणार

बुलढाणा जिल्ह्य़ातील एम.आय, टँक, पाझर तलाव, गाव तलाव, नाला रुंदीकरण, खोलीकरण, सपाटीकरण तसेच शेततलावांमधील गाळ काढण्यात येत आहे. यामध्ये एमआय टँक ११५, पाझर तलाव १३८, गावतलाव सात, नाला रुंदीकरण व खोलीकरणाची १७८१ आणि १५० शेततलावांचा समावेश आहे. या एकूण दोन हजार १९१ प्रकल्पांतील तीन कोटी ८१ लाख ८४ हजार ५०३ क्युबिक मीटर गाळ काढण्यात येणार आहे.

जिल्ह्य़ात रोजगारनिर्मिती

भारतीय जैन संघटनाद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्य़ात राबविण्यात येणाऱ्या सुजलाम सुफलाम मोहिमेमुळे बुलढाणा जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मितीही झाली आहे. या माध्यमातून गाळ काढण्यात येणाऱ्या गावातील स्थानिकांनाच रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. संघटनेच्या वतीने ३६० विविध पदांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधीही मिळाली आहे.

दुष्काळमुक्तीचा ‘बुलढाणा पॅटर्न’

राज्यभरात दुष्काळमुक्तीच्या अशा कामांचा ‘बुलढाणा पॅटर्न’ राबविण्यात यावा, त्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा, त्यासाठी शासन जैन संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिमेच्या प्रारंभीय कार्यक्रमात दिली. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतीलाल मुथा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे मोठे काम करीत आहे. खऱ्या समाजसेवी कामाचे दर्शन शांतीलाल मुथा यांच्या कामातून होत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे लक्ष्य

भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे लक्ष्य आहे. सध्या बुलढाणा जिल्हय़ात व्यापक प्रमाणात मोहीम सुरू करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्यात येईल. गत सात ते आठ वर्षांपासून संघटनेच्या वतीने दुष्काळमुक्तीचे कार्य सुरू आहे.    – प्रा. सुभाष गादिया, समन्वयक, भारतीय जैन संघटना.