News Flash

करोना काळातही कृषी क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित! राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर

राज्याचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पाहणी अहवाल सादर करण्यात आला असून त्यामध्ये फक्त कृषी क्षेत्राची सकारात्मक वृद्धी दर्शवण्यात आली आहे.

फोटो सौजन्य - इंडियन एक्सप्रेस

२०२० हे संपूर्ण वर्ष करोनामुळे सर्वच उद्योग आणि क्षेत्रांसाठी कठीण गेलं. त्यातही लघु उद्योग आणि बाजारपेठेवर याचा मोठ्या प्रमाणावर विपरित परिणाम झाला. मात्र, असं असताना महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रानं सकारात्मक वाढ दर्शवली आहे. अर्थव्यवस्थेचे तीन प्रमुख आधार क्षेत्र असलेल्या सेवा, कृषी आणि उद्योग क्षेत्रांपैकी कृषी हे एकमेव असं क्षेत्र ठरलंय जिथे सकारात्मक वाढ झाली आहे. तीही ११.७ टक्के! दुसरीकडे उद्योग क्षेत्रात वजा ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात वजा ९.० टक्के इतकी वाढ दर्शवण्यात आली आहे. ८ मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार असून त्याआधी राज्याचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रानं केलेली कामगिरी मांडण्यात आली आहे.

करोना काळात एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यामध्ये देशाचा आर्थिक विकासदर हा वजामध्ये गेला असून राज्यामध्येही काहीशी तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्याप्रमाणे २०२०-२१च्या पूर्वानुमानानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत देखील उणे ८.० टक्के वृद्धी अपेक्षित आहे. करोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे राज्याचं पुढील वर्षभरातलं स्थूल उत्पन्न चालू किंमतीनुसार २६ लाख ६१ हजार ६२९ कोटी इतकं अपेक्षित ठेवण्यात आहे.

सरकारी उपाययोजनांमुळेच शेती क्षेत्राची सकारात्मक वाढ!

दरम्यान, फक्त शेती क्षेत्रानंच दाखवलेल्या सकारात्मक वृद्धीसाठी राज्य सरकारनं वेळोवेळी राबवलेल्या शेती आणि संबधित क्षेत्रांसाठीच्या उपाययोजना कारणीभूत ठरल्याचा दावा आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळेच शेती क्षेत्राला कोविडचा सर्वात कमी फटका बसल्याचं देखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, शेती क्षेत्रासोबतच संबंधित क्षेत्र असलेल्या पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी आणि मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रांमध्ये अनुक्रमे ४.४ टक्के, ५.७ टक्के आणि २.६ टक्के अशी वृद्धी अपेक्षित आहे.

निर्मिती आणि बांधकाम क्षेत्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये अनुक्रमे वजा ११.८ टक्के आणि वजा १४.६ टक्के अशी नकारात्मक वाढ असल्याचं राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 2:55 pm

Web Title: maharashtra economical survey report 2020 21 positive growth in agriculture sector pmw 88
Next Stories
1 शिवसेनेचे मत म्हणजे आमचे मत नव्हे, नाना पटोले यांचं वक्तव्य
2 “फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज”
3 वीज ग्राहकांना दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात २ टक्के कपात
Just Now!
X