कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला भोपळाही फोडता आला नाही. सीमाप्रश्नासाठी लढणारा मराठी माणसाचा बुलंद आवाज बेळगावातच थांबला असून आता त्याचे आक्रंदन विधानसभेत प्रकटणार नाही. पुन्हा एकदा सीमावासीयांना रस्त्यावरची लढाई अटळ बनली आहे. सीमाभागातील मराठी नेतृत्वाची दुही सीमालढय़ाच्या मुळावर आली आहे. महाराष्ट्र एकीकरण मध्यवर्ती समितीची ताठर भूमिका आणि किरण ठाकूर गटाची बंडखोरी यात काँग्रेस – भाजपचे चांगभले झाले आहे. अडेलतट्टपणा, सीमानेत्यांचा अहंभाव दूर होईपर्यंत तरी सीमाभागातील मराठी माणूस मताचे दान समितीच्या पारडय़ात टाकण्याची शक्यता कमीच आहे.

कर्नाटकाच्या जोखडातून बाहेर पडून माय मराठीभूमीत सामावण्यासाठी बेळगावासह सीमाभागातील मराठी बांधव आतुर झाला आहे. या ओढीने तो कानडी दबावाला बळी न पडता गेली सहा दशके प्राणपणाने लढा देत आहे. अशा वेळी कधी सत्त्वपरीक्षेचे, तर कधी अग्निदिव्याचे प्रसंग येत राहिले. त्यामधूनही हा लढा तावूनसुलाखून निघाला. मराठी माणसाला दुहीचा शाप आहे, असे म्हटले जाते. सीमाभागातील निकालांनी याचा प्रत्यय आणून दिला आहे. विधानसभेतील संख्याबळ दोनवरून अधिक वाढणार अशी शक्यता निवडणुकीपूर्वी वर्तवली जात होती. पण, ती निकालाने फोल ठरवली. मराठी बांधवांतील यादवी यास कारणीभूत ठरल्याचा मुख्य प्राथमिक निष्कर्ष आहे.

यशापयशाचे हेलकावे

यंदा दारुण अपयशाला सामोरे जावे लागले असले तरी सीमावासीयांना पराभव नवा नाही. यशापयशाचे अनेक हेलकावे सीमाभागाने अनुभवले आहेत. या भागातून एके काळी पाच आमदार निवडून गेले होते. पण, १९९९ मध्ये समितीचा एकच आमदार निवडून आल्यावर आता सगळेच संपले अशी आरोळी ठोकली गेली. पण, २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आले. २००८ मध्ये मराठी बांधव राहत असलेल्या मतदारसंघात फोडाफोडी करण्यात आली, परिणामी समितीचे सगळे उमेदवार पडले. तेव्हाही असाच गदारोळ उठला होता. पाच वर्षांपूर्वी वातावरण बदलले आणि संभाजी पाटील, अरिवद पाटील ही जोडगोळी विधिमंडळात पोहोचली. आता पुन्हा दुही आणि अहंभाव नडला. मराठी पाऊल पुढे पडण्याऐवजी मागे फेकले गेले.

एकीचे प्रयत्न आणि दुहीची बीजे

सीमाभागात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना उमदेवारी निवडीचे अधिकार दिले. त्यांनी निश्चित केलेल्या बेळगाव दक्षिण (प्रकाश मरगाळे), ग्रामीण (मनोहर किणेकर), खानापूर (अरिवद पाटील) या मध्यवर्ती समितीच्या उमेदवारांची नावे ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे यांनी जाहीर केली. मात्र, ही नावे मान्य नसल्याचे सांगत दुसऱ्या गटाने बंडाचा झेंडा हाती घेतला. गटबाजीला तिलांजली द्यावी, अशी निष्ठावंतांची मागणी होत असताना किरण ठाकूर गटाने मध्यवर्तीची ध्येयधोरणे बाजूला सारून उमेदवारी अर्ज मागविले. त्यातून किणेकर यांच्याविरोधात मोहन बेळगुंदकर, मरगाळे यांच्याविरोधात किरण सायनाक तर आमदार पाटील यांच्याविरोधात विलास बेळगावकर हे उभे ठाकले. मध्यवर्ती समितीने आपला परीघ थोडा वाढवून नाराजांची मनधरणी करावी व एकीसाठी धडपडणाऱ्या सीमावासीयांच्या प्रयत्नांना थोडी बळकटी मिळवून द्यावी, अशी मागणी होऊ लागली. पण मध्यवर्तीकडूनही असा विचार गांभीर्याने झाला  नाही. मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता स्पष्टपणे जाणवू लागल्याने दोन्ही गटात ऐक्य साधले जावे यासाठी प्रयत्न केले गेले असले तरी त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला. सीमाभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही एकीकरण समितीतील बेकी चव्हाटय़ावर आली. मराठी विरुद्ध मराठी असे चित्र सीमाभागातील खानापूर, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दिसून आले. समितीचा सामना समितीशी असा विसंवाद रंगल्याने शक्तिप्रदर्शनाने अर्ज सादर करण्याचा प्रकार यंदा दिसला नाही.

मराठी नजरेतून पराभव

सीमाभागात मराठी उमेदवारांचे झालेले पानिपत मराठी भाषिकांच्या जिव्हारी लागले असून, त्याबद्दल उलटसुलट मतांतरे व्यक्त केली जात आहेत. समितीच्या नेत्यांतील दुही आणि ऐक्याचा अभाव पराभवास कारणीभूत असल्याचे ठाकूर गटाचे पराभूत उमेदवार किरण सायनाक यांनी सांगितले. मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी या पराभवास महाराष्ट्रातील नेत्यांना दोष दिला.

सीमाभागाला यशापयश नवे नाही. निवडणुकीच्या काळात गटबाजी होत राहते. मात्र, कसल्याही साधनांविना गब्बर उमेदवारांशी लढणे सोपे नाही. अशा वेळी  महाराष्ट्रातून  सहानुभूती व्यक्त करण्याखेरीज भरीव सहकार्य मिळत नाही, अशी खंत त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. डाव्यांनी समितीच्या प्रचाराला सहकार्य केले होते. त्यातील एक प्रमुख प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी समितीच्या दुहीला कंटाळलेल्या मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांना जवळ करून धडा शिकवला, असे निरीक्षण नोंदवले. तर, सीमाभागातील तरुणाईने पराभवाचे खापर उभय गटाच्या नेत्यांवर फोडत त्यांनी आता तरी सुधारावे अशी अपेक्षा व्यक्त केली. झाले गेले विसरून नेत्यांनी स्वत:चा अहंकार दूर सारावा, किमान कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी एकत्र यावे, अन्यथा सीमाप्रश्नासाठी हौतात्म्य पत्करलेले हुतात्मे तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत. आता चुकलात तर कार्यकत्रे तुम्हास पायदळी तुडवतील, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला आहे. आता या साऱ्यातून उभय गटाचे नेते कोणता बोध घेतात यावर सीमाप्रश्नाची सीमा ठरणार आहे.

दोघांच्या भांडणात..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमाभागात उमेदवार न देता समितीच्या पाठीशी राहण्याची खंबीर भूमिका घेतली. मात्र, समितीतील दुहीचा फटका निकालातून दिसला. अपेक्षेचे सारे इमले पत्त्यासारखे कोसळले. खानापूरमध्ये आमदार अरिवद पाटील आणि माजी आमदार दिगंबर पाटील गटाचे उमेदवार विलासराव बेळगावकर यांच्यातील मतविभागणीत काँग्रेस उमेदवार अंजली िनबाळकर यांनी बाजी मारली. िनबाळकर यांना ३६, ६४९ मते मिळाली. ती पाटील (२६,६१३) व बेळगावकर (१७,०००) यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा कमी आहेत. दुहीच्या राजकारणात मतविभागणीमुळे मतदारांनी काँग्रेसला हात दिला. बेकीमुळे सीमाबांधवांचा घात झाला. बेळगाव दक्षिणमध्येही पेरण्यात आलेल्या बेकीच्या बिजाला पराभवाची कटू फळे आली. सीमानेत्यांच्या कुटिल राजकारणाला कंटाळलेल्या समितीच्या बहुसंख्य मतदारांनी समितीच्या उमेदवारांना झिडकारत कमळ उगवू दिले. प्रकाश मरगाळे यांना १९, ५१९ मतांवर समाधान मानावे लागले तर ठाकूर गटाच्या किरण सायनाक यांना ७२६२ मते मिळाली. भाजपचे अभय पाटील यांनी ६८, ६७० मते मिळवून विजयी  पताका फडकावली. बेळगाव ग्रामीणमध्ये माजी आमदार मनोहर किणेकर (२३,७७६)  हे  तिसऱ्या क्रमांकावर लोटले. दुसरे मराठी उमेदवार मोहन बेळगुंदकर यांनी तर हजारीही पार केली नाही. काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कर्नाटकात सर्वाधिक १ लाख २ हजार मते घेत विक्रम नोंदवला. हॅट्ट्रिक साधण्यासाठी धडपडणारे भाजप उमेदवार संजय पाटील यांना (५०, ३१६) दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बेळगाव उत्तरमध्ये ठाकूर गटाचे बाळासाहेब काकतकर यांची एकटय़ाचीच उमेदवारी असतानाही त्यांना अवघी १८६९ मते मिळाली. भाजपच्या अनिल बेनके (७९,०५७) यांनी काँग्रेस उमेदवार फिरोज सेठ ( ६१,७९३) यांची हॅटट्रिक रोखली.