राज्यात सर्वत्र पडझड होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्हा परिषदेत ६४ पैकी ३९ जागांवर विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे. जिल्ह्य़ातील सर्व अकराही पंचायत समित्यांवरही पक्षाने झेंडा फडकावला आहे. सात जागा जिंकून भाजपाने चांगली कामगिरी केली. काँग्रेस २१ जागांवरून ७ वर खाली आला.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षासाठी बालेकिल्ला राहिला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पक्षाला या जिल्ह्य़ात यश मिळाले होते. परंतु यंदा भाजपची लाट, स्वपक्षातील खासदार उदयनराजे भोसले यांनी निर्माण केलेले आव्हान यामुळे चुरस निर्माण झाली होती. परंतु या साऱ्यांतही पक्षाने आपले स्थान कायम राखले आहे.

बंडखोरांच्या तडाख्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्ह्य़ातील आपली हुकमत पुन्हा एकदा सिद्ध केल्याने सर्वपक्षीय छुप्या समझोत्याबरोबरच बंडोबा आणि मित्रपक्ष काँग्रेसचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे काँग्रेसला पक्ष पुनर्बाधणीचे आव्हान पेलावे लागेल.  आयात केलेल्या नेत्यांच्या बळावर भाजपाने ७ जागांवर मुसंडी मारताना, काँग्रेसची बरोबरी साधली आहे. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीला फक्त तीन जागा मिळाल्या. राष्ट्रवादीशी घातलेला तंटा पाहता उदयनराजेंना आता स्वतंत्र बाण्याचा विचार करावा लागेल.

कराडमध्ये त्रिशंकू स्थिती 

बंडखोर काँग्रेसनेते विलासकाका उंडाळकर यांची कराड तालुका विकास आघाडी जिल्हा परिषदेच्या तीन जागा जिंकून खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीशी बरोबरी साधून आहे. कराड पंचायत समितीच्या ७ जागा जिंकून पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या उंडाळकरांनी आपल्या हाती राखल्या आहेत. मात्र, उंडाळकर राष्ट्रवादीशी पुन्हा जुळवून घेऊन पुत्र उदयसिंह यांची विधानसभेची वाटचाल सुकर करतील असे राजकीय गणित बांधले जात आहे.

कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देऊ शकले नाहीत. कराड दक्षिण व माण तालुक्यात काँग्रेसचा झालेला दारुण पराभव काँग्रेस नेत्यांसाठी धोक्याची घंटा असून, घडले, बिघडले याचा ताळेबंद न लावल्यास काँग्रेसचा हात सातारा जिल्ह्य़ातून हद्दपार झालेला असेल. पाटण तालुक्यात राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचा गजर झाला असला तरी शंभुराज यांच्या नेतृत्वाला शह बसेल असे सध्यातरी चित्र दिसत नाही. पाटण तालुक्यातही हिंदुराव पाटील व पृथ्वीराजांचे पुतणे राहुल यांच्या पराभवाने काँग्रेसला हादरा बसला आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीनंतर सातारा जिल्ह्य़ात विशेषत: कराड व पाटण तालुक्यात काँग्रेस बलवान होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, इथेच काँग्रेसचे पाय गाळात रुतू लागले आहेत. आजची काँग्रेसची स्थिती पाहता साताऱ्यातील काँग्रेसला तारणार कोण? असा कळीचा प्रश्न आहे. मदनराव मोहिते यांच्यासारखा आक्रमक नेता काँग्रेसला सोडून थेट भाजपात गेला आणि पृथ्वीराज चव्हाणांवरच बरसल्याने काँग्रेस अंतर्गत घुसमट चव्हाटय़ावर आली. तर, वाईचे माजी आमदार मदन भोसले हे शांत आहेत. एकंदर परिस्थिती पाहता, काँग्रेसला तारणारा नेता आजमितीला तरी काँग्रेसकडे नाही. हे कटू सत्य आहे.